औंढा नागनाथ येथील पाणीटंचाईचा प्रश्न दूर करण्यासाठी नवीन प्रस्तावित पाणीयोजनेसाठी १३ कोटींचा निधी येत्या अर्थसंकल्पात देण्यात येईल, अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मुनगंटीवार यांनी गुरुवारी िहगोलीहून परभणीला नियोजित कार्यक्रमास जात असताना औंढा येथे नागनाथाची महापूजा केली. औंढा येथील नवीन पाणीयोजनेचा प्रस्तावित आराखडा तयार करून पाठवा. त्यास १३ कोटींचा निधी येत्या अर्थसंकल्पात मंजूर केला जाईल, तसेच वन विभागातर्फे मंदिर परिसरात सुरू असलेल्या उद्यानास निधीही कमी पडू दिला जाणार नाही. औंढा नागनाथ हे देशातील आठवे ज्योतिर्लिग असल्याने येथे दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. त्यामुळे औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. भाजपचे युवा सरचिटणीस शरद पाटील, पक्षाचे ज्येष्ठ कार्यकत्रे पांडुरंग पाटील, तेजकुमार झांझरी आदींच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
भाजप नेत्यांकडूनच बेदखल!
मुनगंटीवार हे गुरुवारी पुसद-िहगोली-औंढा माग्रे परभणीकडे जात असताना कळमनुरी येथे भाजप तालुकाध्यक्ष संजय कावडे यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, िहगोली शहरातून रवाना होत असताना स्थानिक भाजप नेत्यांनी दखल घेतली नाही. विशेष म्हणजे नाईकनगर येथून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भाजपचे जिल्हा कार्यालय आहे. इतकेच नाहीतर आमदार तान्हाजी मुटकुळे दिवसभर शहरात असताना त्यांनीही मुनगंटीवार यांची भेट घेण्याचे औचित्य दाखवले नाही.