*  बेळगावमधील घटना
* भ्रूण हत्येचा प्रकार की वैद्यकीय विल्हेवाट?
राष्ट्रीय महामार्ग चारनजीकच्या महाराष्ट्र-कर्नाटक  सीमेवरील बेळगावनजीकच्या संकेश्वर गावामध्ये हिरण्यकेशी नदीच्या पात्रात रविवारी १३ अर्भकांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही अर्भके स्त्री अथवा पुरुष लिंगाची असल्याबाबत अद्याप खुलासा होऊ शकलेला नाही. गेल्या रविवारीही याच ठिकाणी तीन अर्भके मृतावस्थेत आढळल्याने एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयात अथवा रुग्णालयात अभ्यासानंतर विल्हेवाट लावण्यासाठी येथे टाकण्यात आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
कोल्हापूरपासून ६० किमी अंतरावर, संकेश्वर तालुक्यातील हिरण्यकेशी नदीजवळून जात असलेल्या एका व्यक्तीला नदीच्या चिखलात हे मृतदेह आढळले. त्याने पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर बेळगाव येथून आरोग्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले. ही अर्भके तीन ते पाच महिने वयोगटातील असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अधिक तपासणीसाठी हे मृतदेह बेळगावमधील ‘बिम’ या संस्थेकडे पाठवण्यात आले असून १५ दिवसांत त्याचा अहवाल अपेक्षित आहे.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा भ्रूणहत्येचा प्रकार आहे का, याचाही शोध सुरू आहे. मात्र, या अर्भकांच्या लिंगाचे निदान झाल्यानंतरच त्याचा उलगडा होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
गेल्या रविवारीही याच ठिकाणी तीन अर्भके मृतावस्थेत आढळली होती. त्यामुळे कदाचित एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाने अभ्यासासाठी ही मृत अर्भके आणली असावीत व काम झाल्यानंतर त्याची योग्य प्रक्रियेद्वारे विल्हेवाट न लावता ती अशी फेकून दिली असावीत, असा पोलिसांचा कयास आहे.