पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावरील केसनंद येथे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असताना, चार मजली इमारतीच्या घुमटाचा स्लॅब कोसळून तेरा जणांचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाला. मृतांमध्ये अभिषेक पाटील हा अभियंता आणि बारा मजुरांचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेत चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाईल, असे पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी सांगितले.
पुण्याजवळील केसनंद येथे भारतीय संस्कृती दर्शन संस्थेचे आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय आहे. या महाविद्यालयाच्या परिसरात पंचकर्म रुग्णालयाच्या चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. चार मजले बांधून झाल्यानंतर घुमटाचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू असतानाच दुपारी अडीचच्या सुमारास हा स्लॅब खाली कोसळला. त्या वेळी स्लॅब भरण्याचे काम करणारे कामगार त्या स्लॅब सोबत खाली आले व त्या ढिगाऱ्याखाली अडकले.
अग्निशामक दलाचे जवान व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी मृतदेह काढण्याचे काम दुपारी तीन वाजता सुरू केले. चार तासांच्या प्रयत्नांनंतर १३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी  या प्रकरणी चौकशी सुरू असून तज्ज्ञांकडून परीक्षण केल्यानंतर दोषी असलेल्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.