एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषणातून तेराव्या वर्षीच मातृत्व लादले गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मुलीला तिच्या आजीने पूर्वीच मुरळी बनवल्याचेही पुढे आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व स्पार्क या संस्थांनी याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलगी व तिची आजी यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
या घटनेतील पीडित मुलीचे वडील वीटभट्टीवर काम करतात, मात्र त्यांनी दुसरे लग्न केले असल्यामुळे ते परगावी राहतात. पीडित मुलीची आईही वीटभट्टीवर मजुरी करते. मुलीच्या आजीने नवस बोलून तिला लहानपणीच खंडोबाची मुरळी केले. शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी तिला शाळेत दाखल करून शिक्षणप्रवाहात टिकविण्याचा सातत्याने प्रयत्न केला, मात्र असे असतानाही मुलीच्या आजीने तिला जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला पाठविण्यास सुरुवात केली. यातच मुलीवर लैंगिक अत्याचार होऊन तेराव्या वर्षीच तिच्यावर मातृत्व लादले गेले. या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून डोंगराच्या कडेला एका छोटय़ा खोपटय़ात तिला ठेवण्यात आले होते. कुलकर्णी व स्पार्क संस्थेचे श्रीनिवास रेणुकदास यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यां रंजना गवांदे यांच्या निदर्शनास ही बाब आणली, त्यानंतर दोन्ही संस्थांनी अकोले पोलिसांकडे याबाबत तक्रारअर्ज देऊन चौकशीची मागणी केली.
या तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक एम. बी. पाटील यांनी तातडीने कारवाई केली व पोलीस पथक पाठवून या पीडित मुलीच्या आजीने बाळंतपणानंतर तिला जेथे ठेवले होते तेथून तिला ताब्यात घेतले. रंजना गवांदे, श्रीनिवास रेणुकदास, हेरंब कुलकर्णी, सिस्कॉम संस्थेचे राजेंद्र धारणकर यांची या कामी
मदत मिळाली.
या घटनेच्या चौकशीला काही काळ लागणार असल्याने पोलिसांनी पीडित मुलीला तात्पुरते महिला सुधारगृहात पाठविले आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी व दोषींवर देवदासी प्रतिबंधक कायदा २००५ तसेच बालकांचे लैंगिक शोषण २०१२ यातील तरतुदीनुसार कारवाई करावी अशी मागणी रंजना गवांदे, श्रीनिवास रेणुकदास व हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक वैशाली कोरे पुढील तपास
करीत आहेत.