मराठवाडय़ात चालू वर्षांत म्हणजे मागील १३० दिवसांत तब्बल ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सन २००३पासून सुरू झालेले आत्महत्यांचे सत्र थांबायला तयार नाही. गेल्या १२ वर्षांत २ हजार ८५७ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. पकी १ हजार ६९३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेती समस्येतून झाल्याचे सरकारने मान्य केले. मात्र, आत्महत्या थांबविण्यात सरकारला सपशेल अपयश येत आहे. या समस्येवर काय उपाययोजना करावी, हे आता समजेनासे झाल्याचे मान्य करीत कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘तुम्हीच सांगा, काय उपाययोजना करायच्या’ असे हतबल उद्गार नुकतेच काढले.
आत्महत्या का होत आहेत, या अनुषंगाने अभ्यास करणाऱ्या टाटा इन्स्टिटय़ूटमधील शहाजी नरवडे म्हणाले की, या विषयावर आता एवढे अभ्यास झाले आहेत की त्यातील किती शिफारशी लागू झाल्या याची तपासणी करावी लागेल. स्वामिनाथन समितीने दिलेल्या अनेक शिफारशी अजून अंमलबजावणीत आल्या नाहीत. अनेक अहवालांवर चर्चा झाली, पण उत्पादन खर्चावर आधारित दराचा विषय तसाच रेंगाळतो.
अभ्यासकांच्या मते उपाययोजनांची अंमलबजावणी नीटपणे होत नाही. काही समस्यांवर उपायच नाहीत, असे सांगत कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे म्हणाले की, गारपीट झाली, काय उपाय आहे? निसर्गाच्या दुष्टचक्रात आपण अडकलो आहोत. पाऊस आता ऑगस्टमध्येच होतो. त्यामुळे मूग, उडीद ही पिके बाद ठरू लागली आहेत. परिपूर्ण पाणलोट हे यावर उत्तर असू शकते. मात्र, त्यासाठी कमालीची कमी तरतूद आहे. अन्य कोणत्याच योजनेत लोकसहभागाची अट टाकत नाहीत. एकूण शेतकऱ्यांना खंबीर करण्यास प्रयत्न करावे लागतील. पूर्वी केलेले अभ्यास चुकले का, हे देखील तपासावे लागेल. नवीन अभ्यास करावे लागतील.
गेल्या १२ वर्षांत २००६मध्ये ३७८ आत्महत्या झाल्या. गेल्या वर्षी हा आकडाही पार झाला. तब्बल ५७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता तर केवळ १३० दिवसांत ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने दररोज सरासरी दोघांचा अशा प्रकारे होणारा मृत्यू नक्कीच काळजी वाढविणारा आहे. हतबल सरकार आणि वाढत जाणारा आत्महत्येचा आकडा, असे विदारक चित्र आहे.
दृष्टिक्षेपात आकडेवारी
क्र.       वर्ष     एकूण प्रकरणे     पात्र
१        २००३          १४              ३
२        २००४          ९५             ५०
३        २००५          ५८             २७
४        २००६         ३७८           १६०
५        २००७         ३२७           १८९
६        २००८         २८५           १७४
७        २००९         २२८           १२४
८        २०१०         १९१           ११५
९        २०११         १६९             ८२
१०      २०१२         १९८           ११८
११      २०१३         २०७           ११५
१२      (२०१४ ते     ५७४           ४२९
         आतापर्यंत)