आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप करताना महायुती अबाधित राहण्यासाठी भाजप-शिवसेनेने थोडा त्याग करण्याची गरज आहे. महायुतीकडून किमान १५ जागा तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडाव्यात, अशी मागणी या पक्षाचे नेते, खासदार रामदास आठवले यांनी केली. १५ पेक्षा कमी जागा घेणार नाही, अशी ठाम भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
सोलापुरात एका आंदोलनात सहभागी होण्यासाठी आल्यानंतर खासदार आठवले यांनी निवडक पत्रकारांशी संवाद साधताना आगामी विधानसभा निवडणुकीविषयी आपली भूमिका विशद केली. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्ट व नकारात्मक कारभाराला सामान्य जनता कंटाळली आहे. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे. अर्थात, यात रिपाइंची मते निर्णायक ठरतील, असा दावाही त्यांनी केला.