शंभरी पार केलेल्या आणि आजही ‘क्लिक निक्सन’ या  ब्रिटीश कंपनीच्या ताब्यात असलेल्या यवतमाळ-मूर्तीजापूर या ‘शकुंतला’ नावाने परिचित नॅरोगेज रेल्वेचे अखेर ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारने १५०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती सेना नेत्या खासदार भावना गवळी यांनी दिली.

उल्लेखनीय म्हणजे, संपूर्ण देशात यवतमाळ-मूर्तीजापूर-अचलपूर व पुलगाव-आर्वी या फक्त विदर्भातच असलेल्या तीनही रेल्वेमार्गांपकी आर्वी-पुलगाव रेल्वे केव्हाचीच बंद होऊन भंगारातही गेली आहे. उर्वरित २ नॅरोगेज रेल्वेमार्गाचे ब्रॉडग्रेजमध्ये रूपांतर करण्यास भगिरथ प्रयत्नानंतर केंद्र सरकारने मान्यता दिल्याची आनंददायी वार्ता यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या सेना खासदार भावना गवळी यांनी दिली. त्यांनी प्रत्येक निवडणूक काळात ‘शकुंतला’च्या ब्रॉडगेजमध्ये रूपांतराचे आश्वासन दिले होते, पण ते पूर्ण होण्याची आशा संपली होती, त्यामुळेच वर्धा-नांदेड माग्रे यवतमाळ हा रेल्वेमार्ग मंजूर झाला, पण तोही कासवगतीने सुरू आहे. ‘शकुंतला’चे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होण्यासाठी एक याचिकाही संसदेच्या याचिका समितीसमोर दाखल झाली होती. आता यवतमाळ-मूर्तीजापूर आणि मूर्तीजापूर-अचलपूर हे दोन्ही नॅरोगेज मार्ग ब्रॉडग्रेजमध्ये बदलण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. गेल्या १९१६ मध्ये क्लिक निक्सन या ब्रिटिश कंपनीने या तीन नॅरोगेज रेल्वे सुरू केल्या होत्या. आश्चर्य म्हणजे, देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यावरही या तीन रेल्वे गाडय़ा आजही क्लिक निक्सन कंपनीच्याच ताब्यात आहेत. त्या ‘शकुंतला’ नावाने ओळखल्या जातात.

प्रतीक्षा इथली संपत नाही..

ही ‘शंकुतला’ सुमारे ७० वर्षे वाफेच्या इंजिनवर ‘चालत’ होती. ११० किलोमिटर अंतर कापायला शकुंतला ११ तास घेत होती. नंतर ती डिझेल इंजिनवर ‘धावायला’ लागली. आता ती ६ तास घेते. गरिबांची जीवनरेखा असलेली ‘शकुंतला’ आता बॉडग्रेज होण्याची प्रतीक्षा किती वर्ष करावी लागेल, हे मात्र स्पष्ट झाले नाही. ‘शकुंतला’चे उत्पन्न व खर्च यात जमीन अस्मानाचे अंतर पडले आहे. डिझेलच्या चढलेल्या किमती, रेल्वे पायलट, गार्ड, स्टेशन मास्तर आणि कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, यामुळे ही रेल्वे प्रचंड तोटय़ात आहे. कारण, तिचे रोजचे उत्पन्न ३०० रुपयेही नाही. या मार्गावरील कारंजा वगळता सारे स्टेशन्स उद्ध्वस्त होऊन बंद पडले आहेत.