तालुक्यात नागपूर-सुरत महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कंटेनर घेऊन जाणारा ट्रक आणि प्रवासी जीप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १७ ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ट्रकचे टायर फुटल्याने तो समोरून येणाऱ्या जीपवर उलटला. त्यातच दुचाकी वाहनही अपघातग्रस्त वाहनावर धडकले. मृत व जखमी हे धुळे तालुक्यातील फागणे, मुकटी व अजंग गावातील रहिवासी आहेत.

खासगी जीपमधून प्रवाशांना घेऊन जीप नागपूर-सुरत महामार्गाने धुळ्याकडे निघाली होती. काटसर शिवारातून जीप जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकचे टायर फुटले. काही समजण्याच्या आत ट्रकवरील कंटेनर जीपवर कोसळला. त्यात जीपचा निम्म्याहून अधिक भागाचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जीपवर कोसळलेला कंटेनर हलविण्यासाठी क्रेनसह महामार्गावरील इतर वाहनांची मदत घ्यावी लागली. अपघातातील १७ मृतांमध्ये नऊ महिला व सहा पुरूषांचा समावेश आहे. गंभीर जखमी अवस्थेतील दोन जणांना वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृतांमध्ये चेतन पाटील, नरेंद्र पाटील, जीपचालक विजय गुलाबराव पाटील, सुनील प्रेमराज जैन, योजना भटू पाटील (सर्व रा. मुकटी), हेमलता मनोहर चौधरी, भारती हिरालाल बडगुजर, वसंत पंढरीनाथ पाटील (रा. फागणे), रामलाल तुळशीराम तिवारी, सिताबाई फुला अहिरे (रा. अजंग), सुलोचनाबाई राजेंद्र भदाणे (रा.  नावरा) आणि रऊफ शेख इस्माईल उर्फ शेख वायरमन (धुळे) यांचा समावेश आहे. पाच जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. मुकटी येथे कार्यकर्तीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक आटोपून धुळ्याकडे जीपमधून परतणाऱ्या काही कार्यकर्तीही अपघातात सापडले. जीपची प्रवासी क्षमता केवळ दहा असताना त्यामध्ये १७ पेक्षा अधिक प्रवाशांना बसविण्यात आले होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली.