सलग दहा दिवसांहून अधिक काळ झालेल्या गारपिटीने जिल्ह्य़ात रब्बी पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे वीज कंपनीचे साडेतेराशेपेक्षा जास्त खांब उखडून पडले, तसेच ३० जनित्रेही बंद पडल्याने २ हजार ग्राहकांची वीज खंडित झाली, तसेच विजेचा लपंडाव सहन करण्याची वेळ आली. प्राथमिक अंदाजानुसार महावितरणला दोन कोटींचा झटका बसला. एकीकडे विजेची हानी, चोरी यामुळे त्रस्त असलेल्या महावितरणला अस्मानी संकटातील नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे.
जिल्हय़ात जीवित व वित्तहानीही मोठय़ा प्रमाणात झाली. पिकांसह फळबागांना गारपिटीचा फटका बसला. वीज कंपनीचे शेतकरी ग्राहक जोडणीचे जवळपास ९०० वीजखांब पडले. अनेक ठिकाणी तारा तुटल्या. सुदैवाने यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, साडेतीनशे खांबांच्या तारा तुटून खांबही मोडून पडले. बीड शहरासह जिल्हय़ात सातत्याने विजेचा लपंडाव होत राहिला. दोन हजारपेक्षा अधिक ग्राहकांना याचा फटका बसला. साडेतेराशे खांब पडल्याचा परिणाम आजही जिल्हावासीयांना भोगावा लागत आहे. वारंवार वीज खंडित होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मोठय़ा वाहिनीवरील ५७६ खांब वाऱ्यामुळे पडले. १३२ केव्हीच्या पुरवठय़ाच्या अनेक तारांवर झाडे पडल्यामुळे वीज खंडित झाली. कंपनीचे २ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी वर्तविला. गळती, वीजचोरी थांबविण्याचे आव्हान पेलत असलेल्या अधिकाऱ्यांसमोर नसíगक आपत्तीमुळे मोठा ताण आला आहे. अनेक ठिकाणी तारा ओढण्याचे काम तातडीने सुरू झाले. वीज कर्मचाऱ्यांची काही यंत्रणा शहरातील मास्टरप्लॅनच्या कामात गुंतली होती. मात्र, मोठय़ा प्रमाणात हानी झाल्याने वीज खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे तेथील यंत्रणा या कामासाठी वापरण्यात येत आहे. सध्या बऱ्याच प्रमाणात काम झाले असून, काही ठिकाणी खांब रोवण्याचे काम सुरू आहे.