दुष्काळी भागात टँकरने पाणीपुरवठा होत असताना या पाण्याची अधिकारी-कर्मचाऱ्यांकडूनच सौदेबाजी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात पंचायत समिती कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले, तर तहसीलदार व नायब तहसीलदार या दोघांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली. पाण्याचे भीषण दुर्भक्ष्य निर्माण झाले असताना कर्मचारीच पसे घेऊन पाणी देत असल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली.
जिल्ह्याच्या दुष्काळी स्थितीत राबवण्यात येत असलेल्या उपाययोजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात का? हे पाहण्यासाठी नगरपालिका, पंचायत समिती व तहसील कार्यालयात पत्रकारांनी स्टिंग ऑपरेशन केले. यात अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून होणारी पाण्याची सौदेबाजी चव्हाटय़ावर आल्याने खळबळ उडाली. पालिकेचे पाणीपुरवठा सभापती गोपाळ गुरखुदे यांच्याकडे बांधकामासाठी पाण्याच्या टँकरची मागणी केली असता विकतचे टँकर देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. यानंतर पंचायत समिती कार्यालयातील सहायक कर्मचारी लक्ष्मीकांत सौदंतीकर, अनुलेखक गयासोद्दीन जुबेरी यांच्याकडेही बांधकामासाठी पाण्याची मागणी केली. त्या ठिकाणीही त्यांनी पाणी विकण्यास सहमती दिली. तहसीलदार अशोक नांदलगावकर व नायब तहसीलदार कमल कुटे यांनीही खेडय़ामध्ये दोनऐवजी एक खेप टाकून दुसरी खेप तुमच्याकडे वळवली जाईल, असे सांगितले.
दुष्काळी भागात पाण्यासाठी मारामार होत असताना प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी पाणी विकण्याचा उद्योग करीत असल्याचे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालय, तसेच पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. पाणीविक्री गोरखधंद्याचे प्रसारण होताच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी लक्ष्मीकांत सौदंतीकर, गयासोद्दीन जुबेरी यांना तात्काळ निलंबित केले. तहसीलदार नांदलगावकर, नायब तहसीलदार कुटे यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
अधिकारी-कर्मचारीच पाणी विकण्याचा उद्योग करीत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याविषयी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांची गय केली जाणार नाही. सर्व प्रकारावर लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.