मंगळवेढा एसटी बसस्थानकात दोन महिला वाहकांमध्ये अक्षरश: ‘फिल्मी स्टाईल’ हाणामारी होऊन त्याचे पर्यावसान अखेर या दोन्ही वाहकांच्या नोकरीवर निलंबनाची कु ऱ्हाड आणण्यात झाले. मंगळवेढा बसस्थानकाचे आगारप्रमुख अनिलकुमार घेवारे यांनी या दोघी महिलावाहकांविरूध्द निलंबनाची कारवाई केली.
बबिता गावडे व रोहिणी कोलते अशी दोघा निलंबित एसटी बसवाहकांची नावे आहेत. या दोघी मंगळवेढा एसटी बसस्थानकात कर्तव्यावर असताना किरकोळ कारणावरून दोघीत वाद निर्माण झाला आणि तो विकोपास गेला. परिणामी दोघींनी अगदी ‘फिल्मी स्टाईल’ने हाणामारी केली. हा प्रकार बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक हरिदास लोखंडे यांनीही पाहिला. त्यांनी हस्तक्षेप करून हाणामारी थांबविण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा अहवाल त्यांनी आगारप्रमुख घेवारे यांच्याकडे सादर केला. त्याची गंभीर दखल घेत घेवारे यांनी या दोघी भांडखोर महिला वाहकांविरूध्द निलंबनाची कारवाई केली.