काळापहाड प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीत मुदतवाढीचा अर्ज सादर केल्याने काँग्रेसचा बडतर्फ शहर जिल्हाध्यक्ष आरोपी भानुदास कोतकरला न्यायालयाने २ हजार रुपये दंड आकारणी केली. ही रक्कम साक्षीदार, धुळ्यातील प्रांताधिकारी व नगरचे तत्कालीन तहसीलदार भामरे यांना साक्षी भत्ता म्हणून देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कुलकर्णी यांनी आज, शुक्रवारी आदेश दिला. चास-कामरगाव येथे बेकायदा खाण उत्खनन करून सुमारे ८८ लाख रुपयांची रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्याच्या आरोपावरून भानुदास कोतकर, महादेव कोतकर व रामदास उर्फ रामसिंग काळापहाड या तिघांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. यासंदर्भात मंडलाधिकारी प्रभाकर पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे निधन झाले आहे.
खटल्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल होऊन सुनावणी सुरू झाली आहे. आज तत्कालीन तहसीलदार भामरे यांची साक्ष होती, ते त्यासाठी धुळ्याहून येथे आले होते. परंतु कोतकरच्या वतीने मुदतीचा अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला. कोतकरचे वकील राजेंद्र कोठारीही अनुपस्थित होते. कनिष्ठ वकिलामार्फत अर्ज सादर करण्यात आला. हा अर्ज मंजूर करतानाच न्यायालयाने कोतकरला दोन हजार रुपये दंड केला. ही रक्कम साक्षी भत्ता म्हणून भामरे यांना देण्याचा आदेश झाला. सरकारतर्फे सरकारी वकील नितीन वाघ काम पाहात आहेत.