गणेश मूर्तिकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून या वर्षी जवळपास २५ लाख गणेशमूर्ती देशभरात पाठवण्यात आल्या आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत आणि कामगारांच्या मजुरीत वाढ झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्केने वाढ झाली आहे.

आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे पेणच्या गणेशमूर्तीना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशांतून मागणी होत असते. पेणमध्ये गणपती बनवणाऱ्या ४५० लहान-मोठय़ा कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी २५ ते ३० लाख गणेशमूर्ती बनवल्या जातात. देश-विदेशांत या गणेशमूर्तीची विक्री केली जाते. यातून जवळपास ४० कोटींची उलाढाल होत असते. या वर्षीदेखील पेणमधून २५ लाख गणेशमूर्ती देश-विदेशांत पाठविण्यात आल्या आहेत. मात्र काथ्या, प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडूची माती, रंग आणि कारागिरांची मजुरी यात वाढ झाल्याने गणपतींच्या किमती यंदा २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. गणेशमूर्तीसाठी लागणारा कच्चा माल हा केरळ, राजस्थान आणि गुजरातमधून येत असतो. त्यामुळे काथ्या, शाडूची माती आणि पीओपीच्या किमती आणि वाहतूक खर्चात दरवर्षी १० ते १३ टक्केने वाढ होत असते.

दुसरीकडे कुशल कारागिरांची कमतरता ही पेणमधील गणेशमूर्ती व्यवसायासमोरील मोठी अडचण असते. त्यामुळे चांगली मजुरी देऊन कारागीर मिळत नाहीत. जे मिळतात त्यांना दिवसाला चारशे ते पाचशे रुपये द्यावे लागतात. त्यामुळे गणपतींच्या किमती दरवर्षी २० ते ३० टक्क्यांनी वाढवाव्या लागतात, असे येथील गणेश मूर्तिकार सांगतात.

गणपतीच्या किमतीत दरवर्षी २५ ते ३० टक्के वाढ अभिप्रेत असतानाही, बऱ्याचदा मूर्तिकार एवढय़ा मोठय़ा प्रमाणात किमती वाढवत नाहीत. या व्यवसायात असलेली स्पर्धा याला कारणीभूत असते. पूर्वी पेण शहरापुरता असलेला हा व्यवसाय आज संपूर्ण तालुक्यात पसरला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठे पर्याय उपलब्ध झाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली तरी मूर्तीच्या किमतीत मोठी वाढ करता येत नाही अशी माहिती पेण गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी दिली.