मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय यांना मंगळवारी मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला. हायकोर्टाने मेजर उपाध्याय यांना १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यानंतर जामीन मिळणारे मेजर रमेश उपाध्याय हे पाचवे आरोपी आहेत.

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी रमेश उपाध्याय यांनी मुंबई हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. हायकोर्टाने रमेश उपाध्याय यांना १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. दुचाकीत बॉम्ब ठेवून हा स्फोट घडवण्यात आला होता. या स्फोटात ६ जण ठार झाले होते. तर शंभरहून अधिक जखमी झाले होते. या स्फोटात हिंदूत्ववादी संघटनांचा हात असल्याचा आरोप असून दहशतवादविरोधी पथकाने याप्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह १२ जणांना अटक केली होती. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने पाच जणांविरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगितले होते. तर कर्नल पुरोहितसह अन्य आरोपींवरील मोक्का हटवण्याचेही एनआयएने न्यायालयात सांगितले होते. याप्रकरणात सुमारे चार हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.  पुरोहित आणि उपाध्याय यांच्यातील दुरध्वनीवरील संभाषण तपास यंत्रणांच्या हाती लागले होते.

मालेगाव स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांना काही महिन्यांपूर्वी जामीन मंजूर झाला असून दोघेही तुरुंगातून बाहेर आले आहेत. तर १९ सप्टेंबररोजी सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.