महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत शिर्डी शहरातील एकूण ३० किलोमीटर लांबीच्या २५ रस्त्यांसाठी २१ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
शिर्डी शहरातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. राज्याच्या नगरोत्थान योजनेतून ही कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात शहरातील २५ रस्त्यांचा समावेश आहे. यातील नगरपंचायतीच्या हिश्श्याची रक्कम श्री साईबाबा संस्थानमार्फत उपलब्ध होणार असल्याचे विखे यांनी सांगितले.
या रस्त्यांमुळे शिर्डीतील दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटेल. अंतर्गत रहदारी बाह्य़मार्गाने जाणार असल्याने शहरांतर्गत रहदारी कमी होण्यास मोठी मदत होईल. सन २०१८ मध्ये साईबाबांच्या समाधीस १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पाश्र्वभूमीवर शिर्डीच्या विकासाला राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी विविध प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. शहराच्या विकासासाठी शासनाच्या योजनांमधून विविध विकासकामे यापूर्वीही मार्गी लावली आहेत. शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन शहरातील रस्ते चांगल्या पद्धतीने व्हावेत असा प्रयत्न आहे, असे विखे यांनी सांगितले.