आषाढी यात्रेदरम्यान पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून पायी व वाहनाने जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी उस्मानाबाद विभागाने यंदा २२० बसगाडय़ांचे नियोजन केले आहे. यात्रेच्या अगोदर ३ दिवसांपासून व पुढे ४ दिवस म्हणजेच २३ ते ३१ जुल दरम्यान जिल्ह्यातील ६ आगारांतून या बसगाडय़ांच्या फेऱ्या सुरू असतील.
आषाढी वारीसाठी विविध गावांतून पंढरीकडे निघालेल्या िदडय़ा, पालख्यांसोबत वारकऱ्यांना परतीचा प्रवास सुखकर करता यावा, तसेच जिल्हाभरातून विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी यात्रेदरम्यान जाणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी एस. टी. महामंडळाचे मागील १० दिवसांपासून नियोजन सुरू आहे. कळंब आगारातून सर्वाधिक ५० बसगाडय़ांच्या फेऱ्या होणार आहेत. या पाठोपाठ उस्मानाबादहून ४७ व तुळजापूरहून ४६ गाडय़ांची, तर परंडा आगारातून १८ ज्यादा बसगाडय़ांची व्यवस्था केली आहे.
यात्रेच्या अगोदर २३ जुलपासून यात्रेपर्यंत सहा आगारांतून १७० बसगाडय़ा पंढरपूर वारी करणार आहेत. २७ जुलस आषाढी एकादशी आहे.
भंगार गाडय़ा दुरुस्तीत महामंडळ उदासीन
महामंडळाच्या उस्मानाबाद विभागातील परंडा, उस्मानाबाद, भूम व उमरगा या ४ आगारांत मोठय़ा प्रमाणात भंगार गाडय़ा आहेत. ग्रामीण भागात खराब रस्त्यांवर धावून या गाडय़ा सतत नादुरूस्त होतात. चालत्या बसगाडय़ांचा चांगल्या रस्त्यांवरही खडखडाट असतो. अशा भंगार व प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या बसगाडय़ा दुरुस्तीकडे महामंडळाचे दुर्लक्ष आहे. अशा गाडय़ा वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी वारकरी वर्गातून होत आहे.
बसफेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडणार
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला फेऱ्या करणाऱ्या जादा बसगाडय़ांचा परिणाम ग्रामीण भागातील नियमित बसफेऱ्यांवर होणार आहे. अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागणार आहेत. त्यामुळे यात्राकाळात प्रवासी व विद्यार्थ्यांची चांगलीच गरसोय होणार आहे. एकंदरीत यात्राकाळात ग्रामीण भागात बसफेऱ्या करणाऱ्या बसगाडय़ांचे वेळापत्रक प्रत्येक आगारात नेहमीप्रमाणे कोलमडणार आहे.