आर्णी या आदिवासी व मागास तालुक्यात सुमारे २५ बालके कुपोषित असल्याचे संबंधित विभागाच्या पहाणीतून स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.  
विषेश म्हणजे, कुपोषणाचे प्रमाण वाढणार नाही व नियंत्रित राहावे, यासाठी राज्य शासनाने एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या माध्यमातून ५ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींची तपासणी दर महिन्याला करण्यात येते. असे असतांनाही २५ बालके कुपोषणग्रस्त आढळले आहेत. आर्णी तालुक्यात आर्णी, लोणबेहळ, भांबोरा, लोणी, सावळी (स), म्हसोला या सहा केंद्रांवर एकात्मिक बालविकास यंत्रणेकडून १ ते ५ वर्षांच्या बालकांची नियमित तपासणी केली जाते. नुकतेच या केंद्रावर १० हजार ४५० बालकांची तपासणी करण्यात आली. त्यात २५ बालके कुपोषित असल्याचे उघड झाले आहे.
शासनाच्या माध्यमातून सुमारे ३५० कर्मचारी बालकांच्या तपासणीपासून तर त्यांचा पोषण आहार पोहोचविण्यापर्यंत कार्यरत असतांना कुपोषित बालकांची संख्या वाढल्याने हा प्रश्न संबंधित यंत्रणेच्या दृष्टीने गंभीर झाला आहे.
२५ बालके कुपोषित, तर १२५ बालके कमी वजनाची असल्याने ही धोक्याची घंटी समजली जात असून सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे व राष्ट्रवादीचे आमदार ख्वाजाबेग यांनी या संदर्भात लक्ष देण्याची गरज आहे.