गर्भावस्थेचे नऊ महिने पूर्ण झाले की, बाळाचा जन्म हा मातृत्वाच्या आनंदाचा परमावधीचा क्षण. मात्र, दुर्दैवाने काही मातांच्या नशिबी हा क्षण येत नाही. कारण त्यांचे बाळ जन्मतचा मृत असते. यंदा राज्यात अशा २५ हजार मातांच्या नशिबी हा दुखाचा क्षण आला. बालकांच्या जन्माची गेल्या वर्षीची आकडेवारी पाहता उपजत मृत्यू होणाऱ्या बालकांचे प्रमाण यंदाही कायम राहिल्याचे दिसून येते. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार २०१३-१४ या वर्षांत राज्यात एकूण १७ लाख ५० हजार बाळंतपणे झाली. त्यात अंदाजे १७ लाख ७० हजार बालकांचा जन्म झाला. मात्र, त्यातील २५ हजार ४०४ बालके मृतावस्थेतच जन्माला आली. मृत जन्माला आलेली अंदाजे ९००० बालके शहरातील होती, तर उर्वरित १६ हजारांहून अधिक बालके ग्रामीण भागातील होती. गेल्या वर्षी (२०१२-१३) राज्यात १८ लाख ११ हजार बालकांचा जन्म झाला होता. यापैकी २९,५०० बालके मृतावस्थेत जन्माला आली होती. विशेष म्हणजे गरोदरपणात मातेची योग्य काळजी घेतली गेल्यास बालकाचा जन्मत:च मृत्यू होणे सहज टाळता येण्याजोगे आहे.

बाळातील व्यंग समजण्यासाठी पुढील चाचण्या आवश्यक
* गरोदरपणाच्या ११ ते १२ आठवडय़ाच्या सुमारास ‘डबल टेस्ट’ करून घ्यावी.
* उशीर झाल्यास १६ ते १८ आठवडय़ाच्या सुमारास ‘ट्रिपल टेस्ट’ करून घ्यावी.  
* रक्ताच्या ‘ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट’(जीटीटी) व ‘ग्लायकोसिलेटेड एचबी’ या चाचण्या
* थायरॉइड चाचणी
* मातेकडून बाळाला होऊ शकणारे संसर्ग शोधून काढण्यासाठीची ‘टॉर्च टेस्ट’

गरोदरपणात योग्य काळजी घेतल्यास मातेच्या गर्भाशयातच मृत्यू पावणाऱ्या बालकांचा मृत्यू टाळता येतो. गरोदरपणातील आवश्यक तपासण्या व सोनोग्राफी वेळेवर करून घेणे, गर्भवतीच्या आहाराकडे योग्य लक्ष देणे आणि गर्भवतीला बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्यानंतर उपस्थित परिचारिका, प्रशिक्षित सुईणी आणि डॉक्टरांनी तिच्याकडे सातत्याने लक्ष पुरवणे या गोष्टी आवश्यक आहेत.   
डॉ.
सुधाकर कोकणे,
सहाय्यक संचालक, आरोग्य विभाग

बाळात मोठे व्यंग असेल तर बाळ मृत जन्माला येण्याची शक्यता असते. तसेच, मातेला तीव्र मधुमेह असल्यास बाळंतपणाच्या ३८ व्या- ३९ व्या आठवडय़ानंतर बाळ मृत जन्मास येण्याचा धोका असू शकतो. मातेच्या गर्भाशयातील पाणी कमी झाल्यामुळे किंवा बाळाला मिळणारा प्राणवायू कमी पडल्यामुळेही बाळाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच बाळंतपणास विलंब झाल्यामुळेही बाळ मृत्यू पावू शकते. सोनोग्राफीत गर्भातील बाळाची वाढ, गर्भजल यांची स्थिती कळते.     
– डॉ. अरविंद संगमनेरकर, स्त्रीरोग व प्रसुतितज्ज्ञ