सिंधुदुर्गात २८९ शेकरू प्रत्यक्षात झाडावर दिसलेले आहेत. मात्र घरटे नसलेले शेकरू पाहता त्यांची संख्या २५४ आहे असे वनखात्याने म्हटले आहे. शेकरूंची विपुलता आहे, पण वनखात्यांनी गणना करतानाची पद्धत चुकीची असल्याचे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात वनखात्याची सहा वनक्षेत्र आहेत. त्या सहाही वनक्षेत्रात सन २०१५-१६ या वर्षांसाठी शेकरूंची गणना करण्यात आली. राज्य सरकारने शेकरूंच्या गणनेचा निर्णय घेतला पण वनखात्याने कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काही केले नाही, असे वन्य प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे.
या सहाही वनक्षेत्रात प्रत्यक्षात झाडावर दिसलेले शेकरू- सावंतवाडीत (३३), कुडाळ (१२), कणकवली (३८), कडावल (४५), दोडामार्ग (१३५), आरोली (२६) मिळून २८९ शेकरू आहेत. दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक १३५ शेकरू दिसले आहेत. शेकरू हा शेडय़ुल प्राणी आहे.
त्याचा ज्या भागात वावर आहे, त्या भागात पर्यावरणाचे रक्षण व्हायला पाहिजे. पण सर्वाधिक शेकरू दिसलेल्या दोडामार्ग तालुक्यात मायनिंगचा प्रभाव आहे. वनखात्याने शेकरू गणनेत प्राणीमित्रांना व वन्य प्राणीप्रेमींना विश्वासात घेतले आहे. त्यांना विश्वासात घेऊन गणना केली असती तर शेकरूंची संख्या प्रत्यक्षात वाढली असती.
वनजंगलातच शेकरूची गणना करण्यात आली आहे. आज शेकरू खाजगी जंगलात तसेच लोकवस्ती जवळ असणाऱ्या देवराईतही दिसतात. त्यासाठी वन्यप्राणी मित्र व वनप्रेमींच्या समन्वयातून शेकरूंची गणना होण्याची गरज होती, तसे झाले नाही.
सावंतवाडी वनक्षेत्रात ३३ शेकरू दिसले, पण ४९ शेकरूंचे घरटे वापरात नव्हते तर १८ दुरुस्त नाही. तसेच ४० शेकरू घरटे सोडून गेलेले मिळून १११ शेकरू आढळले आहेत. कडावलमध्ये प्रत्यक्षात झाडावर ४५ शेकरू दिसले. त्यापैकी १२ शेकरू घरटे वापरत नाहीत तर पाच जणांनी दुरुस्तीही केलेले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात १८ शेकरू आहेत.
दोडामार्गमध्ये प्रत्यक्षात १३५ शेकरू दिसले. त्यापैकी ३० शेकरू घरटे वापरले पण २० जणांनी दुरुस्त केले नाहीत. मात्र २४ घरटे संभाव्य संगोपनात आहेत असे ७५ शेकरू आहेत असा वनखात्याचा अहवाल सांगतो. आंबोली वनक्षेत्रात २६ शेकरू दिसले त्यातील १७ जणानी घरटे सोडून दिले तर २५ जण घरटे संगोपन करत आहेत.
आंबोली हा हॉट स्पॉट म्हणून ओळखला जातो. जैवविविधता, वन्यप्राणी विपूलता असणाऱ्या आंबोली वनक्षेत्रात सह्य़ाद्रीचा मोठा पट्टा येतो. या ठिकाणी शेकरूची गणना करण्यात दिरंगाई दिसत असल्याचे वन्यप्राणी मित्रांनी बोलताना सांगितले.
शेकरूंची गणना करण्याचे एक औचित्य वनखात्याने पूर्ण केले, पण प्रत्यक्षात गणना करून गोषवारा दिला. त्यात योग्य दिशा वनखात्याने दाखविली नाही असे म्हटले जाते.
सह्य़ाद्रीच्या पट्टय़ातच नव्हे तर आज लोकवस्तीच्या जवळ असणाऱ्या जंगलातही शेकरू दिसतात. त्यामुळे वनखात्याने सहाही वनक्षेत्रात प्राणीमित्रांना विश्वासात घेऊन गणना केली असती तर शेकरूंची संख्या वाढली असती असे जाणकारांनी बोलताना सांगितले.