तुळजापूरला दर्शनासाठी जाताना वाटेत सहा आसनी रिक्षा व जीपची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात तिघा भाविकांचा मृत्यू झाला, तर अन्य दहा जखमी झाले. सोलापूरपासून जवळच असलेल्या हगलूर (ता. उत्तर सोलापूर) येथे पहाटे हा अपघात झाला.
या अपघातात सहा आसनी रिक्षातील साबूबाई पिरप्पा जाधव (४६, रा. नितीन नगर, अक्कलकोट रोड एमआयडीसी, सोलापूर) व प्रभावती दत्तात्रेय पांढरे (४०, रा. कलावती नगर, एमआयडीसी, सोलापूर) या दोघी, तसेच जीपचालक लखन शाहू लोहार (२१, रा. उळे, ता. उत्तर सोलापूर) या तिघांचा मृत्यू झाला. ही सहा आसनी रिक्षा देवदर्शनासाठी भाविकांना घेऊन तुळजापूरकडे निघाली होती. परंतु पुढे हगलूरजवळ समोरून येणा-या जीपची धडक बसली. यात दोन्ही वाहने तीन वेळा उलटून उलट दिशेला थांबली. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता, तर पूजेचे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते.
जखमींमध्ये बबन काशीनाथ झोंबाडे (५५) व आशाबाई बबन झोंबाडे (४५, रा. भातंबरे, ता. बार्शी, सध्या रा. लोणी काळभोर, पुणे) यांच्यासह दत्ता व्हनमाने (३२, रा. मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर), जयश्री नीलेश गायकवाड (१०), स्वाती नीलेश गायकवाड (१३), ज्योती नीलेश गायकवाड (१२, रा. भवानी पेठ, सोलापूर), इंदुबाई नागणे (५०, रा. अक्कलकोट रस्ता, सोलापूर) यांचा समावेश आहे. या सर्वावर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.