जिल्हय़ाच्या काही भागांत आषाढसरींना सुरुवात झाली असली तरी खरीप हंगामातील पेरणीचे चित्र दुष्काळाचे सावट कायम आहे, याचीच जाणीव करून देणारे आहे. जिल्हय़ात आतापर्यंत अवघ्या तीन टक्के पेरण्या झाल्या आहेत. झालेल्या तुरळक पावसावर काही ठिकाणी बाजरी, कापूस, मका आदीची पेरणी झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचे भाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
नगर शहर परिसरात दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण आहे. काल दिवसभर अधूनमधून पाऊस सुरू होता. गुरुवारीही दुपारनंतर पुन्हा रिमझिम स्वरूपात होत होता. जिल्हय़ात गेल्या जूनमध्ये सरासरीच्या तुलनेत अवघा २८.५ टक्के पाउस झाला. मात्र जुलैच्या पहिल्याच आठवडय़ात १७.८ टक्के पाऊस झाला. या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत. मात्र या पावसाचा उपयोग धरणातील पाणीसाठे वाढण्यासाठी किंवा टँकरच्या खेपा कमी करण्यासाठी होणारा नाही. आज सकाळी ८ वाजता नोंदवला गेलेला जिल्हय़ातील गेल्या २४ तासांतील पावसाची आकडेवारी अशी (आकडे मि.मी.): कोपरगाव ९, श्रीरामपूर ६, राहुरी ४.२, नेवासे १३, नगर ५, शेवगाव ५, पाथर्डी ४, पारनेर २, कर्जत ३, श्रीगोंदे ९. एकूण ७.२, इतर तालुक्यात काल पाऊस झाला नाही.
जिल्हय़ात खरिपाचे सुमारे सव्वापाच लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. पैकी अवघ्या १४ हजार ३५१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तुरळक पावसामुळे शेतकरी बाजरी व कापसाला प्राधान्य देत आहे. कापसाचे एकूण पेरणी झालेले क्षेत्र ७ हजार ११३ हेक्टरवर गेले आहे. नगर तालुक्यात २ हजार ३३७ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली आहे.
जिल्हय़ात सध्या ६ लाखांहून अधिक लोकसंख्येला टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. त्यासाठी १ हजार २४३ वाडय़ा व २५९ गावांना एकूण ३४२ टँकर मंजूर करण्यात आले आहेत. सर्वाधिक टँकर पाथर्डीमध्ये (७९) सुरू आहेत.
खरीप हंगाम वाया जाण्याचीच भीती
मृग व आद्र्रा नक्षत्र कोरडे गेले, दीड महिना पावसाने ओढ दिली. अजूनही परिस्थिती कायम आहे. ढग दाटून येतात, पण पाऊस काही पडत नाही. त्यामुळे खरीप हंगाम वाया जातो काय, असे संकट निर्माण झाले आहे.
हवामान खात्याने आतापर्यंत वर्तवलेले दोन अंदाज चुकीचे ठरले. जून पूर्णपणे कोरडा गेला. ४ जुलैला पाऊस येईल असा वर्तविलेला अंदाजही खोटा ठरला. समुद्रावरील चक्रीवादळाने ही परिस्थिती उद्भवली असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यानंतर केरळ व महाराष्ट्रात समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला. नैर्ऋत्य मान्सूनची वाटचाल राज्यात सुरू असल्याचे सांगण्यात आले. पण दमदार पाऊस जिल्ह्यात झालाच नाही. काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. आता दि. ११, १२ व १३ रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दोन दिवसांपासून ढग दाटून आले आहे. तापमान ३६ अंश, आद्र्रता ८२ असून वाऱ्याचा वेग ताशी अर्धा किलोमीटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे पावसाला अनुकूल असे वातावरण आहे. काही भागांत पाऊस पडला तरी उत्तर नगर जिल्हा कोरडाच आहे. आता मंगळवारी येणाऱ्या अंदाजाकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत.
दोन दिवसांपासून काही भागांत अत्यंत तुरळक पाऊस झाला. आज दिवसभरात दोन तासच सूर्यदर्शन झाले. एकदोन हलक्याशा सरी आल्या. दि. १५ पर्यंत पाऊस झाला नाही तर खरीप हंगाम सोडून द्यावा लागेल. यंदा सोयाबीन, कपाशी व कांदा बियाण्यांची टंचाई होती. पाऊस लांबल्याने टंचाईचा सामना करावा लागला नाही. बाजरी, मूग, उडीद या पिकांची पेरणीच झाली नाही. त्यामुळे आता डाळी यंदा महागच राहणार आहेत. पाऊस लांबल्यास मकापिकाखालील क्षेत्र वाढणे अपेक्षित आहे. १५ जुलैनंतर कपाशी पिकाची लागवड करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
रब्बीतील टंचाईग्रस्त गावे जाहीर
सन २०१३-१४ च्या रब्बी हंगामातील ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी पैसेवारी असलेली गावे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जाहीर केली आहेत. कोपरगाव ६३, श्रीरामपूर ५६, राहाता ३६, राहुरी ९, नेवासे ३९, नगर ९५ व पाथर्डी ५७ अशी एकूण ७ तालुक्यांतील ३५५ गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. या गावातील खातेदारांना नियमानुसार जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे रूपांतर, परीक्षाशुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामांच्या नियमात काही प्रमाणात शिथिलता, शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे आदी सवलती देण्यात आल्या आहेत.