जिल्हय़ातील काँग्रेस इच्छुकांच्या आज मुंबईत मुलाखती झाल्या. नगर शहरातून युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह सहा जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. जिल्हय़ातील पक्षाच्या पाच मतदारसंघातून सुमारे ३१ जणांनी आज उमेदवारीसाठी दावा केला. नगरची जागा युवक काँग्रेसच्या वाटय़ाला जाण्याची शक्यता व्यक्त होऊ लागल्याने तांबे यांचा उमेदवारीचा दावा प्रबळ ठरण्याची शक्यता पक्षाच्याच गोटातून व्यक्त होते.
विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या मागील जागावाटपानुसार जिल्हय़ातील संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, नगर शहर आणि कर्जत-जामखेड या पाच जागा काँग्रेसकडे आहेत. या पाच जागांवरील इच्छुकांच्या आज मुंबईत मुलाखती घेण्यात आल्या. संगमनेर येथून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व शिर्डीतून कृषिमंत्री राधाकृष्ण विखे अशी प्रत्येकी एकाचीच नावे आहेत. उर्वरित तीन मतदारसंघांतच उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. या तीन मतदारसंघांतून आज सुमारे २९ जणांनी उमेदवारी मागितली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे आदी या वेळी उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या श्रेष्ठींनी सर्व इच्छुकांशी एकत्रित चर्चा करून आपापल्या उमेदवारीबाबत म्हणणे मांडण्याची संधी दिली, ती अवघी दोन-तीन मिनिटांची होती. नगर शहरात उमेदवारीसाठी केवळ स्पर्धाच नव्हे तर विरोधी सूरही आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रीजलाल सारडा स्वत: उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांनी आपल्यासह स्थानिक पाच जणांपैकी कोणालाही उमेदवारी द्या अशी मागणी आजही केल्याचे समजते. नाव न घेता त्यांनी तांबे यांच्या उमेदवारीला विरोधच केला.
श्रीरामपूरमधून सर्वाधिक म्हणजे १४ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार युवक काँग्रेसने राज्यात १३ जागा पक्षाकडे मागितल्या आहेत. त्यातील एक जागा नगर जिल्हय़ालाच मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. नगर किंवा श्रीरामपूर यापैकी एक जागा युवक काँग्रेसला मिळू शकेल. मात्र श्रीरामपूरला सध्या पक्षाचाच आमदार असल्याने तेथील बदलाबाबत साशंकता व्यक्त होते. मात्र ही जागा युवक काँग्रेसला गेली तर संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस उत्कर्षां रूपवते व हेमंत ओगले यांचे पारडे जड राहील. ही जागा नगर शहरात मिळाली तर तांबे यांचा दावा प्रबळ ठरेल. याशिवाय कर्जत-जामखेड व श्रीगोंदे या दोन मतदारसंघांत दोन्ही काँग्रेसमध्ये अदलाबदल होण्याचीही शक्यता व्यक्त होते.
प्रमुख इच्छुक
संगमनेर (एकच)- बाळासाहेब थोरात.
शिर्डी (एकच)- राधाकृष्ण विखे.
नगर शहर (एकूण ६)- सत्यजित तांबे, ब्रीजलाल सारडा, विनायक देशमुख, सुभाष गुंदेचा, दीप चव्हाण आणि सविता मोरे.
श्रीरामपूर (एकूण १४)- आमदार भाऊसाहेब कांबळे, हेमंत ओगले, उत्कर्षां रूपवते.
कर्जत/जामखेड (एकूण ९)- अंबादास पिसाळ, प्रवीण घुले, परमवीर पांडुळे.
नागवडेंची मुलाखत
सध्याच्या जागावाटपानुसार श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे नाही. तो राष्ट्रवादीकडे आहे, मात्र आज ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे या जागेसाठी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केली.