नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजीव राजळे व भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह ३२ इच्छुकांनी बुधवारी पहिल्याच दिवशी निवडणुकीचे उमेदवारी अर्ज नेले. दरम्यान, आचारसंहिताभंगाच्या तीन तक्रारीही जिल्हय़ात दाखल झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास आजपासून सुरुवात झाली. नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज नगरलाच दाखल करायचे आहेत. राजीव राजळे (नगर, राष्ट्रवादी) आणि भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी, काँग्रेस) या आघाडीच्या उमेदवारांनी पहिल्याच दिवशी प्रत्येकी चार उमेदवारी अर्ज नेले. अन्य ३० इच्छुकांनी एकूण ७२ अर्ज नेले आहेत. त्यात नगर मतदारसंघात १९ जणांचे ३६ व शिर्डी मतदारसंघात १२ जणांचे २८ आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कवडे यांनी दुपारी पत्रकारांना ही माहिती दिली.
आचारसंहिताभंगाच्या जिल्हय़ात तीन तक्रारी आत्तापर्यंत दाखल झाल्याचेही कवडे यांनी सांगितले. ते म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासोबत चौघांनाच दालनात प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवाराची तीनच वाहने शंभर मीटरच्या कार्यकक्षेत सोडण्यात येतील. उमेदवारांसोबत येणारी वाहने, कार्यकर्ते याचीही नोंद खर्चात घेण्यात येणार आहे अशी माहिती कवडे यांनी दिली. जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी सुनील माळी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद देशमुख या वेळी उपस्थित होते. निवडणूकखर्चासाठी उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते उघडणे बंधनकारक असून अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशीच उमेदवारांना हे खाते उघडावे लागेल, निवडणुकीचा खर्च त्यातून करावा लागणार आहे. या पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रतच उमेदवाराला अर्जासोबत जोडावी लागेल असे कवडे यांनी सांगितले.