पाण्याची टंचाई जाणवत असल्यामुळे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु स्थानिक पाणीपुरवठा योजनांना अखेरची घरघर लागल्याचे चित्र आहे. प्रशासकीय पातळीवर योजनांचा निधी वितरीत झाला असला, तरी तब्बल ३५ गावांच्या पाणीयोजनांचा निधी जिल्हा बँकेत अडकला आहे. निधीच प्राप्त झाला नाही, तर काम सुरू कसे करायचे असा प्रश्न ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना पडला आहे. ज्या ठिकाणी काही योजना कार्यान्वित आहेत, तेथे बनावट कामे झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या गावांतील योजनांचे काम रेंगाळले आहे. 

जिल्ह्यात दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाकडून विविध योजनांद्वारे पाणीपुरवठय़ाची कामे सुरू आहेत. यामध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या पाणीयोजनांच्या कामांमध्ये अनेक अडथळे येऊ लागले आहेत. जिल्हा बँकेत अनेक ठेवीदारांप्रमाणेच शासकीय योजनांची रक्कमही अडकली आहे. जिल्ह्यातील ३५ गावांमध्ये जि. प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कामे सुरू केली. परंतु या योजनेंतर्गत आलेला निधी जिल्हा बँकेत अडकल्यामुळे उर्वरित कामे करायची कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या ३ वर्षांपासून जिल्हा बँकेवर प्रशासकाची नियुक्ती आहे. सध्या केवळ वसुलीचेच उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासकाकडून होत आहे. ठेवीदारांसह ज्या शासकीय योजनांचा निधी बँकेत अडकला आहे, त्याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही. जिल्हा बँकेत निधी अडकल्यामुळे ३५ गावांतील पाणीयोजनांचे काम रेंगाळले आहे.
स्थानिक राजकारण व बँकेत निधी अडकल्यामुळे पाणीटंचाई अधिकच तीव्र जाणवू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यातच या गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येणाऱ्या दिवसांत टंचाईची तीव्रता आणखीच वाढणार आहे. ३५ पकी अनेक गावांमधील पाणीयोजनेचे काम रेंगाळल्यामुळे स्थानिक समितीवर गुन्हेही दाखल करण्यात आले. त्यामुळे या योजना न्यायप्रविष्ट असल्यामुळे कायमच्या रेंगाळण्याची शक्यता आहे.
सत्ता बदलली की समित्या बदलतात!
जि. प. पाणीपुरवठा विभागाकडून गावस्तरावर राबविण्यात येणाऱ्या पाणीयोजना पूर्णत्वाकडे नेण्यात अनेक अडचणी येतात. तांत्रिक अडचणींबरोबर बनावट कामाच्या तक्रारी, निधीची चणचण असे प्रकार सर्रास घडतात. संबंधित गावांमधील ग्रामपंचायतीत सत्ताबदल झाला की, तेथील पाणीयोजनेच्या समित्यांमध्येही बदल होतात. त्यामुळे पाणी योजनेचे काम रेंगाळण्यास आणखी बळ मिळते. समित्यांमध्ये बदल झाला की, मग एकमेकांनी केलेल्या कामाविषयी तक्रारी केल्या जातात. त्यातूनच गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे.