सैन्य भरतीच्या पेपर फुटीप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने राज्यासह देशभरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १८ आरोपींसह ३५० विद्यार्थ्यांना अटक केल्याचे वृत्त एअनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. अटक झालेले बहुतांश आरोपी सैन्याशी संबंधित आहेत. ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरसह गोव्यात शनिवारी रात्री उशीरा छापे टाकून पोलिसांनी आरोपी आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. रविवारी सकाळपर्यंत पोलिसांची छापेमारी सुरू होती.

देशभरातील विविध केंद्रांवर सैन्य दलातील भरतीसाठी आज (रविवारी) ९ वाजता लेखी परीक्षा होते आहे. मात्र आदल्या दिवशी रात्रीच काही जण परीक्षेचा पेपर लिहित असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली. हॉटेल आणि लॉजमध्ये विद्यार्थ्यांना गोळा करुन आरोपी पेपर लिहून घेत असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. यानंतर ठाणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात छापे टाकण्यास सुरुवात केली. यामध्ये आतापर्यंत तब्बल ३६८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये ३५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.