युती तुटल्यामुळे आणि आघाडी फुटल्यामुळे बहुरंगी झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्य़ात एकूण ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.  जिल्ह्य़ातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी मागे घेण्याचा बुधवारी अखेरचा दिवस होता. त्यानंतर पुढे आलेल्या अंतिम चित्रानुसार रत्नागिरी मतदारसंघात सर्वात जास्त (११) उमेदवार निवडणूक लढवत असून दापोली व चिपळूणमध्ये प्रत्येकी १०, राजापूरमध्ये ७ आणि गुहागर मतदारसंघात सर्वात कमी ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या चार प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टीचे गट आणि बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांचा समावेश आहे. माजी कामगारमंत्री भास्कर जाधव, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे विद्यमान आमदार सूर्यकांत दळवी, सदानंद चव्हाण आणि राजन साळवी यांच्याबरोबरच दापोली मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते किशोर देसाई हे बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.   
मतदारसंघनिहाय प्रमुख उमेदवार पुढीलप्रमाणे – दापोली – सूर्यकांत दळवी (शिवसेना), केदार साठे (भाजप), सुजित झिमण (कॉंग्रेस), संजय कदम (राष्ट्रवादी कॉंग्रेस), वैभव खेडेकर (मनसे), किशोर देसाई  (अपक्ष) व अन्य चार.
गुहागर – भास्कर जाधव (राष्ट्रवादी), डॉ.विनय नातू (भाजप), संदीप सावंत (कॉंग्रेस), विजय भोसले (शिवसेना) आणि सुरेश गमरे (बसपा)
चिपळूण – सदानंद चव्हाण (शिवसेना), शेखर निकम (राष्ट्रवादी), रश्मी कदम (कॉंग्रेस), माधव गवळी (भाजप), प्रेमदास गमरे (बसपा) व अन्य पाच.
रत्नागिरी – उदय सामंत (शिवसेना), बाळ माने (भाजप), रमेश कीर (कॉंग्रेस), बशीर मुर्तुझा (राष्ट्रवादी) आणि अन्य सहा.
राजापूर – राजन साळवी (शिवसेना), राजेंद्र देसाई (कॉंग्रेस), अजित यशवंतराव (राष्ट्रवादी), संजय यादवराव (भाजप) आणि अन्य तीन.
 जिल्ह्य़ातील सर्व मतदारसंघांमध्ये लढतींचे अंतिम चित्र बुधवारी स्पष्ट झाल्यामुळे गुरुवारपासून निवडणूक प्रचाराला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांच्या सभा-मेळाव्यांबरोबरच चारही प्रमुख पक्षांचे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते प्रचारासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यापैकी भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा येत्या शनिवारी (४ ऑक्टोबर) होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठीही प्रयत्न चालू आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही रत्नागिरीत प्रचारसभा घेणार आहेत. मात्र त्यांचा दिवस अजून निश्चित झालेला नाही. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या सभांचा तपशील अजून ठरलेला नाही.
राज्याच्या अन्य भागांबरोबरच येथेही १५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी आहे.