गोदावरी नदीपात्रातील दोन जिल्ह्यांच्या हद्दीचा फायदा घेत वाळू ठेकेदाराने तब्बल ४६ हजार ४०३ ब्रास वाळूची चोरी करून जवळपास १६ कोटींचा महसूल बुडवल्याचे चौकशीत उघडकीस झाले. यानंतर मंडळ निरीक्षकाच्या तक्रारीवरून परभणी जिल्ह्यातील अंधापुरी येथील अधिकृत वाळू ठेकेदार जाकेर पटेल याच्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोदावरी पात्रातील वाळू माफियांविरोधात महसूल प्रशासनाने अशा प्रकारे पहिल्यांदाच कारवाई केल्याने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली. प्रशासनाने आता ठेका न दिलेल्या १३ वाळूघाटाच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू केला. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून मोठय़ा प्रमाणात अवैध वाळूउपसा करणाऱ्या माफियांनी धुमाकूळ घातल्याचे अनेकदा स्पष्ट झाले. महसूल प्रशासनाने ठेका दिला नसताना दहशतीच्या बळावर राजरोस वाळूचा उपसा केला जातो. दोन वेळा तहसीलदारांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला.
माजलगाव तालुक्यातील मंजरथला लागून परभणी जिल्ह्याची हद्द सुरू होते. दोन जिल्ह्यांच्या हद्दीचा फायदा घेऊन ठेकेदाराने मागील काही दिवसांत अवैधरीत्या शुक्लतीर्थ िलबगाव येथून तब्बल ४६ हजार ४०३ ब्रास वाळूची चोरी करून १५ कोटी ९२ लाख रुपयांचा महसूल बुडवल्याचे समोर आले. ठेकेदार जाकेर पटेल याला परभणी जिल्ह्यातील अंधापुरी येथील वाळू उपसाचा ठेका मिळाला. अंधापुरीला लागूनच बीड जिल्ह्याच्या हद्दीतील शुक्लतीर्थ िलबगाव येथून पटेल याने अवैध वाळूचा उपसा केला. या बाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार डॉ. अरुण जराड व बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी पाहणी करून चौकशी केली असता वाळूचोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे मंडळ निरीक्षक सुधाकर बुगुजंदेकर यांच्या तक्रारीवरून माजलगाव ग्रामीण पोलिसांत वाळू ठेकेदार जाकेर पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
माजलगाव तालुक्यातील १३ वाळू घाटांचा लिलाव न झाल्यामुळे वाळूचे अवैध उत्खनन होऊ नये, या साठी नदीपात्रात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. इतर वाळूघाटांबाबतही तपासणीसाठी सहा मंडळ अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले. त्यांच्या अहवालानंतर अवैध वाळूउपसा झाला असेल, तर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी सांगितले.