अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील मोठय़ा, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत केवळ ४७.४० टक्के जलसाठा शिल्लक असून, अनेक भागात उन्हाळयात पाणीटंचाईच्या झळा पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक सिंचन प्रकल्पांवर शहरे आणि गावांचा पेयजल पुरवठा अवलंबून आहे. बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील जलसाठय़ाची स्थिती तुलनेने गंभीर आहे.

विभागातील पाच गावांमध्ये आतापासूनच ११ टँकर्सच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अमरावती विभागात ९ मोठे, २३ मध्यम आणि ४१७ लघु प्रकल्प आहेत. सध्या मोठय़ा प्रकल्पांमध्ये ५३.८५ टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ५७.९८ तर लघु प्रकल्पांमध्ये ३९.४२ टक्के पाणीसाठा आहे. विभागातील सर्वात मोठय़ा अप्पर वर्धा प्रकल्पात ५९.५१ टक्के जलसाठा आहे, त्यामुळे अमरावती शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नसले, तरी अनेक लघु प्रकल्प कोरडे पडल्याने त्यावर विसंबून असलेल्या गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये ६५.२२ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात ४४.९९ टक्के, अकोला ४७.३३ टक्के, वाशीम ३०.५७ टक्के तर बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ४९.६३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक मध्यम प्रकल्पांमधून तालुका पातळीवरील शहरांना पाणीपुरवठा केला जातो. काही भागात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने पाणीसाठा वाढू शकला नाही. पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यास त्याचा परिणाम धरणांमधील पाण्याच्या पातळीवर होतो. काही भागात सिंचन प्रकल्प तुडूंब भरले, तर काही भागात ७० ते ८० टक्क्यांपर्यंतच जलसाठा झाला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विभागातील धरणांमध्ये ६९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. दोन महिन्यांमध्ये जलसाठय़ात तब्बल २२ टक्क्यांची घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये विभागात ७७ टक्के पाणीसाठा होता. रब्बी हंगामात अनेक प्रकल्पांमधून सिंचनासाठी पाणी वापरले गेले. औद्योगिक वापरही गेल्या काही वर्षांत वाढला आहे.
अमरावती जिल्ह्यातील ७१ लघु प्रकल्पांमध्ये ६८ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील १०२ प्रकल्पांमध्ये ३५ टक्के, अकोला जिल्ह्यातील ३५ प्रकल्पांमध्ये २७ टक्के, वाशीम जिल्ह्यातील ११३ प्रकल्पांमध्ये ७५ टक्के, तर बुलढाणा जिल्ह्यातील ९६ प्रकल्पांमध्ये ५८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठय़ाची स्थितीदेखील फारशी समाधानकारक नाही. अकोला जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ४० टक्के पाणीसाठा आहे, अमरावती जिल्ह्यातील ४ मध्यम प्रकल्पांमध्ये ८३ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील ६ प्रकल्पांमध्ये १०० टक्के, बुलढाणा जिल्ह्यातील ७ प्रकल्पांमध्ये ८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोठय़ा प्रकल्पांपैकी बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी आणि खडकपूर्णा या प्रकल्पांमध्ये अनुक्रमे ४४, ५६ आणि ६२ टक्के जलसंचय आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अरूणावती आणि बेंबळा प्रकल्पात ८१ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पात ५९ टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील सूत्रांनी दिली.