अडीच लाखांवर पर्यटकांच्या भेटी, ५ कोटी रुपये उत्पन्न
महाराष्ट्रातील दहा प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये विदर्भातील मेळघाट, पेंच व नवेगाव-नागझिरासह लोणार सरोवरला मागे टाकत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पर्यटकांनी ५ व्या क्रमांकाचे पर्यटन स्थळ म्हणून स्थान दिले आहे. यंदा ताडोबाला अडीच लाखांवर पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली असून, ५ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे.
महाराष्ट्राच्या पूर्वेला नागपूरपासून १६० कि.मी.वर वनसमृध्दीने नटलेल्या चंद्रपूर जिल्ह्य़ात पट्टेदार वाघांसाठी प्रसिध्द असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे. ताडोबा कोअर व बफरचे जंगल मिळून एकूण १७०० चौ.कि.मी क्षेत्रात पसरलेला हा विस्तीर्ण व्याघ्र प्रकल्प म्हणजे मध्य भारतातील निसर्ग, घनदाट अरण्य आणि पट्टेदार वाघांसह वन्यजीवांचे आश्रयस्थळ आहे. ताडोबात ८८ पट्टेदार वाघांसह इतर वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी, फुलपाखरू आहेत, तसेच पर्यटकांना आवश्यक पंचतारांकित सुविधा आहेत.
पर्यटन विभागाने पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ, पर्यटनस्थळी उपलब्ध सुविधा, पर्यटकांना मिळणारे लाभ, पर्यटकांसाठी हॉटेल, विश्रामगृह व धर्मशाळेची व्यवस्था आणि पर्यटकांना फिरण्यासाठी आवश्यक वाहनांची सुविधा, हवामान व खानपाणाची व्यवस्था, या बाबी लक्षात घेतल्या आहेत. ताडोबाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ बनविण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नातून त्यांनी ताडोबात पर्यटकांसाठी सर्व सोईसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. डेक्कन ओडिसी ही पंचतारांकित रेल्वे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना घेऊन ताडोबात येते. आर्थिक वर्षांत अडीच लाखावर पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली

शिर्डी एक क्रमांकावर
राज्यातील दहा प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये क्रमांक एकवर नगर जिल्ह्य़ातील शिर्डी देवस्थान, त्या पाठोपाठ वेरूळ, गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी व पाचव्या क्रमांकावर ताडोबा प्रकल्प आहे. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर घारापूर गुंफा, मुंबईचे महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, लोणावळा, खंडाळा यांचा समावेश आहे. राज्यातील पर्यटनाला वाव देण्यासाठी तयार केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.