संपूर्ण राज्यात गाजलेल्या माढा तालुक्यातील बेंदवस्ती येथील पारधी हत्याकांडप्रकरणी सोलापूरच्या सत्र न्यायालयाने सहा आरोपींना दोषी धरून  त्यापैकी दोघा मायलेकींसह पाच आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. तर, सहावा आरोपी दोषी असला तरी तो फरारी असल्याने त्याची शिक्षा स्वतंत्रपणे सुनावली जाणार आहे. एखाद्या खटल्यात एकाचवेळी पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्याची सोलापूरच्या सत्र न्यायालयीन इतिहासातील ही पहिलीच घटना मानली जात आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांनी शुक्रवारी सायंकाळी या खटल्याचा निकाल सुनावला. या पारधी हत्याकांडात दोन महिला व सहा मुले अशा आठ जणांचा जाळून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. केवळ गाव सोडून जात नाही म्हणून हे हत्याकांड करण्यात आले होते. या खटल्यात झुंबरबाई भैरू काळे (वय ५०) तिची मुलगी चांदणी लाल्या पवार (वय २७), जब्बार भानू शिंदे (वय ४६), नेताजी भैरू काळे (वय ३०), व शिवाजी अल्फ्या पवार (वय ३५) अशी फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील सहावा दोषी आरोपी बटऱ्या बागवान्या पवार (वय ५५) हा सध्या फरारी आहे. त्यामुळे त्यास स्वतंत्रपणे शिक्षा सुनावली जाणार असल्याचे न्यायाधीशांनी नमूद केले. तर, अज्या अल्फ्या पवार (वय ३४)  हा खटल्यात जामिनावर सुटल्यानंतर अद्याप न्यायालयात हजर झाला नव्हता. त्यामुळे त्यास फरारी घोषित करण्यात आले आहे. तसेच लाल्या बालूशा पवार (वय ४०) हा देखील सुरुवातीपासून फरारी आहे. त्यामुळे लाल्या व अज्या पवार या दोघा फरारी आरोपींविरूध्द स्वतंत्र खटला चालविण्यात येणार आहे. यातील नववा आरोपी बंटय़ा काळे याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. हे सर्व आरोपी माढा व कुडरूवाडीतील राहणारे आहेत.
या खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड. इनायतअली शेख यांनी नऊ साक्षीदार तपासले. यात प्रत्यक्षदर्शी अभिमान काळे व फिर्यादी सुरेश पवार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. विजय पाटील (बार्शीकर) अ‍ॅड. सुरेश पाटील व अ‍ॅड. एस. आय.खादीम यांनी काम पाहिले. तर आरोपींकडून अ‍ॅड. मिलिंद थोबडे, अ‍ॅड. राजेंद्र बायस, अ‍ॅड. एम. सी. काझी व अ‍ॅड. लोंढे-पाटील यांनी बाजू मांडली.