राज्यात हमी भावानुसारच कापूस खरेदी सुरू असून राज्य शासनाने कापूस पणन महासंघाला ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
शेतकऱ्यांना कापूस खरेदीचा हमी भाव मिळण्याबाबतचा प्रश्न आमदार एकनाथ खडसे यांनी विचारला होता. राज्यात पणन महासंघामार्फत नाफेडशी करार करण्यास विलंब झाल्यामुळे व राज्य शासनाने निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे पणन महासंघाकडून कापूस खरेदी ३० ऑक्टोबर २०१२ पर्यंत सुरू झालेली नाही, अशी विचारणा त्यांनी केली. यावर ३० ऑक्टोबपर्यंत शासनाची कापूस खरेदी सुरू झाली नव्हती, अशी कबुली कृषीमंत्र्यांनी दिली.  कापूस खरेदीबाबत पणन महासंघाने नाफेडचा सब-एजंट म्हणून ६ नोव्हेंबर २०१२ पासून शासनाची कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या १० सप्टेंबर २०१२च्या आदेशानुसार कापसाचे हमी भाव जाहीर करण्यात आलेले आहेत. ९ नोव्हेंबरच्या शासनाच्या निर्णयानुसार कापूस पणन महासंघाला ५०  कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.
पुरामुळे पिकांचे नुकसान
वर्धा जिल्ह्य़ात नद्यांना आलेल्या पुरामुळे सावंगी, कोसारा, दापोरा, चिंचमंडळ, शिवणी, पार्डी परिसरातील शेतक ऱ्यांचे सुमरे तीन हजार ८०९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
आमदार वामन कासावार, विजय वडेट्टीवार व अमीन पटेल यांनी वर्धा जिल्ह्य़ात पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबतच प्रश्न विचारला होता.  अतिवृष्टीमुळे शेतातील पिके व फळबागांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे. नुकसानग्रस्त शेतक ऱ्यांना मदत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचे कृषीमंत्री म्हणाले.
कापूस अनुदान वाटप
गेल्या नोव्हेंबपर्यंत शेतकऱ्यांना कापूस अनुदानाचे दोन हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती पुनर्वसन व मदतकार्य मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी विधासभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
शेतकरी कापूस अनुदानापासून वंचित असल्याबाबतचा प्रश्न आमदार डॉ. संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे, सुरेशकुमार जेथलिया यांनी उपस्थित केला होता. शेतकऱ्यांना वाटप करावयाच्या दोन हजार कोटी रुपयांपैकी १ हजार, ६६३ कोटी रुपयांचे वाटप ऑगस्ट २०१२ पर्यंत झाले. ऑगस्टमध्ये १५४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. ३ लाख, १६ हजार शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्य़ातील २ लाख, ८१ हजार शेतकऱ्यांना ९० कोटी, ४९ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. या जिल्ह्य़ातील बहुतांश शेतकऱ्यांचे खाते जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत आहे. या बँकेवर रिझव्‍‌र्ह बॅँकेने र्निबध लावलेले असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यास विलंब होत आहे, असे डॉ. कदम म्हणाले.
गोसीखुर्द : अधीक्षक अभियंत्याला अटक
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या मोराबर्डी उपसा सिंचन योजनेंतर्गत निविदा मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या अधीक्षक अभियंता मदन माटे याला अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
आमदार वसंत गिते, आर.आर. वाणी, मंगश सांगळे, हर्षवर्धन जाधव, विजयराज शिंदे, संजय रायमुलकर, अनिल गोटे, शिशिर शिंदे, सुधाकर देशमुख, देवेंद्र फडणवीस, मीनाक्षी पाटील, विवेकानंद पाटील व धैर्यशील पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. आरोपी मदन माटे याला १० ऑक्टोबर २०१२ रोजी अटक करण्यात आली. त्याची पोलीस व नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली नंतर जामिनावर सुटका झाली. आरोपीला निलंबित करण्यात आले असून प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे गृहमंत्री म्हणाले.