रायगड जिल्ह्यातील खारबंदिस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर इथे संरक्षक बंधारा फुटल्याने समुद्राच्या उधाण्याचे पाणी लगतच्या परिसरातील शेतात शिरले आहे. त्यामुळे मळणीसाठी काढून ठेवलेले भातपीक नष्ट झाले, तर जवळपास पाचशे एकर परिसरातील शेतजमीन खाऱ्या पाण्यामुळे नापीक होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
कोकणात समुद्राला लागून असणाऱ्या जमिनीला खारभूमी असे म्हणतात. भरतीच्या वेळी समुद्राच्या उधाणाचे पाणी शेतात शिरू नये म्हणून या जमिनीला संरक्षक बंधारे घातले जातात. याला खारबंदिस्ती असे संबोधतात, पण कधी शासकीय उदासीनता, कधी दप्तर दिरंगाई, तर कधी अपुरा निधी यामुळे ही खारबंदिस्ती सध्या अडचणीत आली आहे. योग्य देखभालीआभावी बंदिस्ती कमकुवत होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उधाणाच्या वेळी बंदिस्ती फुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. खारे पाणी शेतात शिरल्याने ही शेती नापीक होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे, तर गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे.
कोकणात ३२ हजार ५१४ हेक्टर येवढे खारभूमी क्षेत्र आहे. यातील २२ हजार ५५९ हेक्टर क्षेत्र रायगड जिल्ह्य़ात आहे. या क्षेत्रासाठी खारलॅण्ड विभागाने १६५ सरकारी बंदिस्ती योजना आखल्या आहेत, पण या योजना राबविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याची ओरड वेळोवेळी केली जाते आहे. खारबंदिस्ती फुटल्याने शेतात खारे पाणी शिरते. यामुळे शेतीचे नुकसान होते.
अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर परिसरात गुरुवारी रात्री खाडीलगतच्या खारबंदिस्तीला तडे गेले. याचा परिणाम धाकटे शहापूर, मोठे शहापूर आणि धेरंड परिसरातील सुमारे ५०० एकर शेतीवर पाहायला मिळाला. उधाणाचे पाणी शेतात शिरल्याने कापणी करून मळणीसाठी काढून ठेवलेले भातपिकाचे नुकसान झाले, तर मुख्य रस्त्याच्या पश्चिमेकडील जवळपास ५० घरांनाही या उधाणाचा फटका बसला आहे. घरात उधाणाचे पाणी शिरल्याने गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे २२ मार्च २०११ ला याच ठिकाणी बंदिस्ती फुटल्याने शेती उधाणाच्या पाण्याखाली गेली होती. मात्र योग्य देखभाली आणि दुरुस्तीअभावी ही बंदिस्ती पुन्हा एकदा फुटली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच हे प्रकार वारंवार होत असल्याचा आरोप केला जातो आहे.
दुसरीकडे या परिसरात टाटा आणि रिलायन्स कंपन्यांचे खासगी वीज प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र शेतकऱ्यांचा या प्रकल्पांना विरोध आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी जमिनी शेतकऱ्यांनी द्याव्या यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न कंपन्यांकडून केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
मुळात कालपर्यंत शेतीपुरता मर्यादित असलेला खारबंदिस्तीचा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या घरापर्यंत येऊन पोहचला आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे या गाभीर्याने बघण्याची वेळ आली आहे. अलिबागमधील माणकुळे, बहिरीचा पाडा आणि नारंगीचा टेप ही गावे या समस्येच्या दुष्परिणामाची प्रमुख उदाहरणे आहेत.
पूर्वी खारबंदिस्तीची कामे ही श्रमदानातून केली जात होती. यासाठी प्रत्येक गावात एका खार सरपंचाची नियुक्ती केली जात असे, त्याच्या देखरेखीखाली लोकसहभागातून गावातील बंदिस्तींची दुरुस्ती कामे केली जात असे. नंतर मात्र हे काम खारलॅण्ड विभागाकडे गेले आणि लोकांचा सहभाग नष्ट झाला. खासगी कंत्राटदाराकडून ही कामे केली जाऊ लागली, त्यामुळे कामाचा दर्जादेखील घसरला. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच लोकसहभागातून प्रत्येक गावात खारलॅण्ड कमिटय़ा स्थापून ही कामे केली जावीत, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहेत.