सप्ताहानिमित्त साबुदाणा खिचडीचा प्रसाद खाल्ल्यामुळे पाचशेपेक्षा अधिक भाविकांना विषबाधा झाल्याचा प्रकार परळी तालुक्यातील गाढेिपपळगाव येथे घडला. विषबाधा झालेल्या भाविकांवर परळी, अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयांत उपचार चालू आहेत.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार आर. टी. देशमुख व संगीता ठोंबरे यांनी रुग्णालयात जाऊन भाविकांच्या प्रकृतीची विचारपूस केली व माहिती घेतली. पाचशेपेक्षा अधिक भाविकांना विषबाधा झाल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने यंत्रणा हलवून ठिकठिकाणच्या रुग्णवाहिका, खासगी वाहने गावामध्ये पाठवून भाविकांना रुग्णालयात आणले. गाढेिपपळगाव येथे संत पाचलेगावकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह सुरू होता. बुधवारी श्रावणी एकादशीमुळे साबुदाणा खिचडी प्रसाद म्हणून तयार केली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास प्रसाद वाटपास सुरुवात झाली. खिचडी खाल्ल्यानंतर लहान मुलांसह वृद्धांनाही उलटय़ा आणि चकरा येणे सुरू झाले. काही वेळात सर्वानाच त्रास होऊ लागला. परळीच्या आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने याची माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य पाहता परळी, अंबाजोगाई येथील रुग्णवाहिका गाढेिपपळगावमध्ये दाखल झाल्या. त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच असल्यामुळे काही खासगी वाहनांतूनही रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. पाचशेपेक्षा अधिक ग्रामस्थांना याचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. शासकीय रुग्णालयांतील जागाही अपुरी पडू लागली. त्यामुळे अनेक रुग्णांना अंबाजोगाई, सिरसाळा येथील शासकीय रुग्णालयांत पाठवण्यात आले. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. रुग्णालयात एकाच वेळी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रुग्ण दाखल झाल्याने वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेऊन विषबाधा झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली व आरोग्य अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. गाढेिपपळगाव येथेही भेट दिली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनाही घटनेची माहिती देण्यात आली. पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क करून आरोग्य पथक तातडीने पाठवण्याच्या सूचना दिल्या. गुरुवारी आमदार आर. टी. देशमुख व संगीता ठोंबरे यांनी परळी, अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या विषबाधित भाविकांची भेट घेऊन विचारपूस केली. ५००पकी ४६० रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले, तर ४० रुग्णांवर अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तपासणीसाठी नमुने घेतले
साबुदाणा खिचडीतून विषबाधेचा प्रकार घडल्यानंतर बीडच्या अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तयार केलेल्या साबुदाणा खिचडीचे नमुने तपासणीसाठी घेतले. याबरोबरच परळीतील ज्या दुकानातून साबुदाणा खरेदी करण्यात आला, तेथील नमुनेही ताब्यात घेण्यात आले. तपासणीसाठी औरंगाबाद येथील अन्न चाचणी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार असून १५-२० दिवसांत त्याचा अहवाल येईल, असे अन्नसुरक्षा अधिकारी सागर तेरकर यांनी सांगितले.