रायगड किल्ल्याच्या संवर्धन सुशोभीकरणासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी तयार केलेल्या ५२१ कोटींच्या आराखडय़ाला पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली. हा आराखडा आता पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे.

िहदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या किल्ल्यावर रोवली गेली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडाचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास केला जाणार आहे. राज्य सरकार आणि पुरातत्त्व विभागाच्या संयुक्त विद्यमाने किल्ल्याचे जतन-संवर्धन आणि सुशोभीकरण केले जाणार आहे. यासाठी कोकण आयुक्तांनी यासाठी तब्बल ५२१ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे.

रायगड किल्ल्याच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी ११७ कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे, पाचाड येथील राजमाता जिजाऊ वाडा आणि जिजाऊ समाधिस्थळ परिसराच्या विकासासाठी ४७ कोटींचा निधी खर्च अपेक्षित आहे. रायगड किल्ला परिसरातील २१ गावांत पायाभूत सुविधांच्या विकासकामांसाठी ४३ कोटींचा निधी, किल्ल्याच्या परिसरात पर्यटन विकासासाठी ७८ कोटींचा निधी, महाड ते रायगड रस्ते विकासकामांसाठी १४५ कोटी, भूसंपादनासाठी १३ कोटी, नवीन रोपवे विकसित करण्यासाठी ५० कोटी आणि आकस्मिक खर्चासाठी २४ कोटींच्या निधीची आवश्यकता असणार आहे.

रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय समितीने मंगळवारी या आराखडय़ाला मान्यता दिली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आता हा प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठवला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५०० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती.

या पाश्र्वभूमीवर जिल्हास्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या वेळी जिल्ह्य़ातील आमदार, जिल्हाधिकारी शीतल उगले, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, बांधकाम विभाग, महावितरण, रेल्वे, राज्य परिवहन, प्रादेशिक परिवहन, महामार्ग प्राधिकरण आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.