सरकारी टँकरना ‘आजारी’ पाडून ग्रामीण भागातील पाणीपुरवठय़ासाठी खासगी ठेकेदारांना अधिक रक्कम मिळावी, असे प्रयत्न जाणीवपूर्वक औरंगाबाद जिल्हय़ात होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. ३१ पैकी केवळ १६ शासकीय टँकरने पाणीपुरवठा होत असून, काही टँकर नादुरुस्त तर काही टँकरना वाहनचालक नसल्याने ते बंद ठेवण्यात आले आहेत. कार्यालयीन कामासाठी ३ टँकर ठेवण्यात आले असून, मराठवाडय़ातील ८ जिल्हय़ांमध्ये ५४ सरकारी टँकर वेगवेगळय़ा कारणांनी बंद ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ज्या गावात टंचाईमुळे टँकर सुरू करण्यात आले, त्याच गावात या वर्षीदेखील पुन्हा टँकरचा फेरा कायम आहे. या कंत्राटदारधार्जिण्या धोरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही दबक्या आवाजात चर्चा आहे. मात्र, कोणीच कागदावर ‘घोळ’ मांडायला तयार नाही. एका टँकरने दिवसभरात किमान ४ फेऱ्या कराव्यात, असे अपेक्षित आहे.
मराठवाडय़ात सद्य:स्थितीत १५५ सरकारी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तब्बल ५४ टँकर सरकारी अनास्थेमुळे बंद आहेत. औरंगाबाद जिल्हय़ात ‘कार्यालयीन कामासाठी’ ३ टँकर बाजूला काढून ठेवण्यात आले. नादुरुस्त टँकरची संख्या ५ आहे, तर वाहनचालक उपलब्ध नाही म्हणून सरकारी टँकरला आजारी घोषित करण्यात आले. जिल्हय़ात तब्बल १९४ खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मंजूर ४३६ खेपांपैकी ४०४ खेपा केल्या जात आहेत. टँकर पोहोचत नसल्याच्या तक्रारी असल्याने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तपास पथकही गठीत केले असून मंगळवारी या पथकाने गंगापूरचा दौरा केला.
मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी सरकारी टँकरला विश्रांती देत खासगी ठेकेदाराला अधिक रक्कम मिळावी, असे प्रयत्न जाणीवपूर्वक झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. नांदेड जिल्हय़ात वाहनचालक नाहीत म्हणून १४ टँकर बसून आहेत. एक टँकर नादुरुस्त आहे, तर इतर कारणांनी अनुपलब्ध या श्रेणीत ६ टँकर आहेत. ६८पैकी केवळ ४७ शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बीड जिल्हय़ातही नादुरुस्त टँकरची संख्या अधिक आहे. ६ टँकर नादुरुस्त, ६ इतर कारणांना अनुपलब्ध व ३ टँकरना चालक नसल्याची माहिती विभागीय आयुक्तांना रीतसर कळविण्यात आली. आयुष्य संपल्यामुळे किंवा टँकर बिनकामांचे झाल्यामुळे ते बाद करण्यासाठी केवळ ४ प्रस्ताव असताना ५४ टँकर बंद ठेवून कोटय़वधींचा फायदा ठेकेदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेकडून ९५ पाणीयोजना सुरू करण्यात आल्या. पैकी ४२ गावांमध्ये त्या कार्यान्वित झाल्या, तर अध्र्याहून अधिक योजनांचे काम पुढे सरकले नाही. टंचाईकाळात तात्पुरत्या नळदुरुस्त्या व नव्या योजनाही प्रस्तावित आहेत. मात्र, टँकर ठेकेदार पोसण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहे. औरंगाबाद जिल्हय़ात ८ मार्चपर्यंत १६ सरकारी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याची आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. सरकारी टँकर किती बंद आहेत, असे विचारताच त्यात ६ टँकर वाढविण्यात आले. २२ सरकारी टँकरने पाणीपुरवठा होत आहे, असे आता सांगितले जात आहे. किरकोळ दुरुस्त्या आणि वाहनचालक नाही, असे फुटकळ कारण देत कंत्राटदारांना पद्धतशीरपणे पोसले जात आहे.