मोहोळ पोलीस ठाण्यात स्वतला अटक करवून घेण्यासाठी हजारो समर्थकांसह येऊन दगडफेक केली व १७ पोलिसांना जखमी करून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मोहोळचे राष्ट्रवादीचे वादग्रस्त आमदार रमेश कदम यांच्यासह ५४ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कळंबा कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे.
काल शनिवारी सायंकाळी उशिरा आमदार कदम व इतरांना अटक करून मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. रविवारी, दुसऱ्या दिवशी या सर्वाना न्यायदंडाकारी डी. बी. हंबीरे यांच्यासमोर हजर केले असता सर्वाना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला गेला.
दरम्यान, आमदार कदम यांनी, जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या सांगण्यावरून आपल्याविरूध्द पोलिसांनी यापूर्वी सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल केला होता, असा आरोप करीत जिल्हाधिकारी मुंडे यांच्या बदलीच्या मागणीसाठी आपण आगामी राज्य विधिमंडळ अधिवेशनात उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. तर, आमदार कदम यांच्या या वादात त्यांच्या बाजूने राष्ट्रवादीची अन्य कोणीही नेतेमंडळी पुढे आली नाहीत.