सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा निवडणुकीत बुधवारी चुरशीने मतदान झाले. या दोन्ही मतदारसंघात ५५ ते ६० टक्के एवढे मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सोलापूर मतदारसंघात ४७.१० तर माढय़ात ५४.२४ टक्के मतदान झाले होते.
सकाळपासून मतदारांचा वाढलेला उत्साह सर्वत्र कमीजास्त प्रमाणात पाहावयास मिळाला. एकीकडे उन्हाळय़ाची तीव्रता वाढून तापमानाचा पारा ४० अंशाच्या वर गेलेला असताना इकडे लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळीमुळे राजकीय वातावरणही तापलेले. यात नरेंद्र मोदींची हवा निर्माण झाली असताना सोलापुरात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे व माढय़ात राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील या दोन्ही बलाढय़ उमेदवारांनी कमालीचा जोर व प्रतिष्ठा पणाला लावल्याचे चित्र बघायला मिळाले. सार्वत्रिक चुरशीच्या वातावरणामुळे विजयाची माळ कोणाच्या गळय़ात पडणार, हे महिन्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
सोलापूर मतदारसंघात सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांनी धाव घेऊन रांगा लावल्या होत्या. शहरी झोपडपट्टी भागात जशी मतदारांची गर्दी होती, तशीच गर्दी मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांच्या भागातही अनेक मतदार केंद्रांवर दिसून आले. तोच उत्साह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये होता. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी मतदारांचा सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्याकडे कल दिसून आला. होटगी रस्त्यावर मजरेवाडी येथे सकाळी साडेआठच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर लागलेल्या मतदारांच्या रांगा, त्यात तरुणाईबरोबर महिलांचा सहभाग हेच प्रतिबिंबित करीत होता. होटगी येथे आश्रमशाळेतील मतदान केंद्रावर पहिल्या दोन तासांत १६ टक्के मतदान झाले होते. याच मतदान केंद्राबाहेर उपेक्षित पारधी समाजाचे स्त्री-पुरुष मतदार भेटले. त्यांची संख्या ३५च्या वर होती. ही मंडळी रोजगारासाठी मुंबईत स्थायिक झालेली. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्थानिक पुढा-यांच्या आग्रहावरून हे सर्व जण गावात आले. परंतु त्यांची नावे मतदारयादीत असली तरी त्यांच्यापैकी एकाकडेही मतदार ओळखपत्र नव्हते. त्यामुळे विशेष करून महिलांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. काही पुरुषांकडे पॅन कार्ड व वाहन ड्रायव्हिंग लायसेन्स होते. त्याचा उपयोग करून मतदान करता येते, हे कळल्यानंतर त्यांची पावले मतदान केंद्राकडे वळली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी व बंकलगी, फताटेवाडी या भागात उत्साह संचारला होता.
तडवळ गावात प्रवेश करताना हागणदारीची दरुगधी सहन करताना मतदान केंद्राकडे पावले पडली. त्या ठिकाणी काँग्रेस व भाजपकडून चुरशीने मतदान होत असल्याचे सांगितले गेले. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रशासनाने आठवडा बाजार रद्द केल्याची घोषणा केली तरी तडवळ गावात एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढत असताना जवळच आठवडा बाजार सुरूच होता. त्या ठिकाणी खरेदीची गर्दी दिसून आली. पानमंगरूळ (ता. अक्कलकोट) येथे सकाळी अकरापर्यंत २५ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. डोंगरीबा व्हटकर या ९४ वर्षांच्या वृद्धाने काठीचा आधार घेत मतदान केंद्र गाठले व मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे उमेदवार अॅड. शरद बनसोडे हे याच गावचे मूळ रहिवासी. त्यांनी सकाळीच मतदान केले. करजगी येथे मतदानाचा उत्साह कमी नव्हता. गावातील शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळताना काही तरुण दिसले. त्यांना हटकले असता त्या सर्वानी सकाळीच मतदान केल्याचे सांगितले. या गावात घरोघरी चिंच सोलण्याचे काम महिला करीत होत्या. त्यापैकी बहुसंख्य महिलांनी मतदान करून आल्याचे सांगताना हाताच्या बोटावरील शाई खुणेने दाखवली. जेऊर येथे मतदानाची टक्केवारी दुपारी एकपर्यंत ३५ टक्यांच्या पुढे गेली होती. याच भागातून पुढे जाताना वाटेत काही शेतांमध्ये शेतमजूर भेटले. त्यापैकी काही जणांनी मतदानाबद्दल निरुत्साह दाखवला. आधी पोटाचे बघू द्या, असे त्यांचे सांगणे होते. अक्कलकोट शहरात दुपारी दोनपर्यंत ३२ टक्के मतदानाचा पल्ला गाठला होता. या ठिकाणी मतदान काँग्रेसच्या बाजूने किती व भाजपच्या बाजूने किती, याची चर्चा रंगत होती. हीच परिस्थिती धोत्री, दर्शनहळ्ळी या भागात दिसून आले.
सोलापूर शहरात सर्वत्र सकाळपासून मतदानाचा उत्साह वाढला होता. दुपारी उन्हाचा त्रास होऊ लागल्यानंतर परिणामी मतदान रोडावले. परंतु तरीही त्यात सातत्य टिकून होते. मुरारजी पेठेतील निराळे वस्तीनजीक उमानगरीत शरदश्चंद्र पवार प्रशालेच्या मतदान केंद्रात सकाळी मतदानाची प्रक्रिया सुरू होताच मतदान यंत्र बिघडले. त्यामुळे सुमारे पाऊण तास तेथील मतदान खोळंबले होते. याच ठिकाणी शकुंतला भागवत संभेराव (९८) या वृद्धेसह उज्ज्वला अंकुश पेठकर (२४) ही अंध तरुणी आणि प्रमोद इजगे (४५) या अपंगाने मतदानाचा हक्क बजावला. रविवार पेठ, साखर पेठ, अशोक चौक, कुमठा नाका, नई जिंदगी परिसर, कोंतम चौक, भवानी पेठ, जोडभावी पेठ, उत्तर कसबा, दक्षिण कसबा, मुरारजी पेठ, रेल्वे लाइन्स, सदर बझार आदी भागात चुरशीने मतदान झाल्याचे सांगण्यात आले. काही मतदारांची नावे मतदारयादीत नसल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित होताना निराशा पत्करावी लागली. भवानी पेठेत इप्पाकायल शाळेच्या मतदान केंद्राबाहेर मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी बसलेल्या एका काँग्रेस कार्यकर्त्यांने स्वत:जवळील लॅपटॉपवरून काँग्रेसचा प्रचार केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यावरून उभय गटात शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर गोंधळ थांबला.
दिवसभरात मतदान शांततेत व सुरळीत आणि निर्भयी वातावरणात पार पडण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. संवेदनशील मतदान केंद्रांच्या परिसरात अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घेतली जात होती. मतदारांना प्रलोभने दाखवली जाऊ नयेत म्हणून एकूणच हालचालींवर करडी नजर ठेवण्यात आली होती. तर दुसरीकडे मतदानात पारदर्शकता येण्यासाठी सर्वच मतदान केंद्रांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. इतकेच नव्हे जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून संपूर्ण मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रांवरील दृश्य तथा हालचाली ‘यू टय़ूब’वरून पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील धारसंग गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला होता.