मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाडिवऱ्हे शिवारात शुक्रवारी पहाटे एका गाडीतून १६.२३ कोटी रुपयांचे तब्बल ५८ किलो सोने लुटले गेल्याने खळबळ उडाली आहे. अतिशय वर्दळीच्या या महामार्गावर इतक्या मोठय़ा रकमेची लूट होण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याने पोलीस यंत्रणाही हादरली.
मुंबई येथील झी गोल्ड कंपनीच्या ६० किलो सोन्याच्या विटा महिंद्राच्या बंदिस्त मोटारीतून शिरपूर रिफाइनरीत नेल्या जात होत्या. पहाटे चारच्या सुमारास घोटी-नाशिक दरम्यानच्या वाडिवऱ्हे शिवारात ही मोटार येताच मागून दुसऱ्या मोटारीतून आलेल्या दरोडेखोरांनी तिला अडविले. आपण पोलीस अधिकारी असून गाडीची तपासणी करावयाची बतावणी  त्यांनी केली.
मोटारीतील ६० पैकी ५८ विटा ताब्यात घेत त्यांनी पलायन केले. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी केली. ठिकठिकाणी वाहनांची तपासणी सुरू झाली. परंतु, दरोडेखोरांची मोटार काही मिळाली नाही.  या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.