स्थानिक संस्था कर (एलबीटी) आणि पारगमन करातून (एस्कॉर्ट) महानगरपालिकेला संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण ५९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. नव्या आर्थिक वर्षापासून मनपाने एलबीटीची विवरणपत्रे व कर भरण्याचीही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
मनपा हद्दीत जकात वसुली सुरू असताना हा ठेका त्या वेळी विक्रमी रकमेला गेला होता. तब्बल ८२ कोटी रुपयांना हा ठेका गेला होता. मात्र राज्य सरकारने जकात कर रद्द करून त्याऐवजी व्यापा-यांना एलबीटी लागू केला. तेव्हापासून जकातीची एलबीटी आणि पारगमन कर अशी विभागणी झाली आहे. जकात वसुली बंद झाली असली तरी शहरातून ये-जा करणा-या मालावर पारगमन सुरू आहे. एलबीटी मनाप स्वत:च वसूल करते, पारगमन कराचा ठेका मात्र जकातीच्याच ठेकेदाराला देण्यात आला आहे.
संपलेल्या आर्थिक वर्षात मनपाला एलबीटीतून ३८ कोटी आणि पारगमन कराद्वारे २१ कोटी असे एकूण ५९ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. मनपा वर्तुळात हे प्रमाण चांगले मानले जाते मात्र दोन्ही करांद्वारे अजूनही पाच ते सात कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न वाढू शकते असे सांगण्यात येते.
दरम्यान नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजे दि. १ एप्रिलपासून एलबीटीची विवरणपत्रे व कर भरण्याचीही सुविधा मनपाने आता ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. विवरणपत्रे वेबसाईटवर ऑनलाइन घेतानाच कर भरण्यासाठी ई-बँकिंगची सुविधा सुरू केली आहे. या दोन्ही गोष्टींसाठी व्यापा-यांना आता मनपात येऊन फॉर्म भरणे व तत्सम गोष्टींची गरज नाही. याबाबत मनपा आयुक्तांकडे एलबीटीच्या समन्वय समितीची बैठक नुकतीच बोलवण्यात आली होती. शहरातील विविध २२ व्यापारी संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मनपा आयुक्त विजय कुलकर्णी यांनी या वेळी बोलताना नव्या सुविधेची माहिती दिली. तसेच मनपाने एलबीटीसाठी कोणत्याही व्यापा-यावर कारवाई केलली नाही हे निदर्शनास आणून देत व्यापा-यांना विनाकारण त्रास देण्याचा मनपाचा हेतू नाही, मात्र त्यासाठी व्यापा-यांनीही मनपाला सहकार्य केले पाहिजे. एलबीटी व त्याची विवरणपत्रेही वेळेवर सादर करून ही पूर्तता करावी, अन्यथा यापुढे मनपाला आता कारवाई करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.