नगराध्यक्षा स्नेहा पाटील, उपसभापती अपर्णा सुर्वे यांच्यासह ६ नगरसेवक शिवसेनेत दाखल 

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी आणि शेकापला आणखी एक धक्का बसला आहे. मुरुडमधील राष्ट्रावादीच्या सहा नगरसेवकांसह शेकापच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील, तसेच मुरुड तालुका पंचायत समितीच्या उपसभापती अपर्णा सुर्वे यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत सेनाभवन येथे झालेल्या कार्यक्रमात हे सर्व जण शिवबंधनात अडकले. मुरुड तालुका राष्ट्रववादी काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्यावर नाराज असलेल्या राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांनी नगरपालिकेत वेगळी चूल मांडली होती. गटनेते महेश भगत, कल्पना पाटील, उदय भाटकर, मेघाली पाटील, संदीप पाटील आणि अशोक धुमाळ या सर्वानी पक्षांतर बंदी कायद्याचा भंग केला म्हणून त्यांना अपात्र ठरवण्यात यावे. यासाठी जिल्हााधिकारी यांच्याकडे दावा दाखल करण्यात आला आहे. या सर्व सहा नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी शीतल उगले यांच्याकडे सादर केले. हे सर्व राजीनामे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारले.

गुरुवारी या सहा नगरसेवकांनी मुंबईत शिवसेना भवन येथे जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. मुरुडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील, उपसभापती अपर्णा सुर्वे यांनीही भगवा झेंडा हातात घेतला. या वेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, शिवसेना संपर्कप्रमुख आदेश बांदेकर, सहसंपर्कप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तसेच मुरुड व अलिबाग तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.