व्याघ्र संरक्षणाकडे दुर्लक्ष

देशात गेल्या पाच महिन्यांत ६० वाघांचा मृत्यू झाला असून मृत्युमुखी पडलेल्या वाघांचे सरासरी वयोमान हे चार ते आठ वर्षे आहे. व्याघ्र संरक्षणाऐवजी पर्यटनालाच महत्त्व दिल्या जात असल्यामुळे १ जानेवारी ते २६ मे या १४७ दिवसांमध्ये ६० मृत्यू म्हणजे अडीच दिवसाला देशात एक वाघ मृत्युमुखी पडत आहे. वाघांच्या मृत्यूचा हा आकडा चिंताजनक आहे.

राज्यात नुकतीच झालेली पाणवठय़ांवरील व्याघ्र गणना आणि त्याच दरम्यान आलेला व्याघ्र गणनेच्या चवथ्या टप्प्याचा अहवाल बघितला तर देशात वाघांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याची आकडेवारी मांडण्यात आलेली आहे. वाघांची संख्या वाढत आहे. हा व्याघ्र अभ्यासकांचा अहवाल असला तरी १ जानेवारी ते २६ मे या पाच महिन्यांच्या कालावधीत देशातील दहा राज्यांमध्ये ६० वाघांचा मृत्यू झालेला आहे. वाघांच्या मृत्यूची ही आकडेवारी अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक आहे. त्याला कारण सरासरी बघितले तर अडीच दिवसाला देशात एका वाघाचा मृत्यू होत आहे. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या वाघांचे वयोमान बघितले तर ते एक वर्षांपासून ते तीन वष्रे आणि  चार ते आठ वष्रे या वयोगटातील वाघांचे सर्वाधिक मृत्यू झालेले आहेत. मध्यप्रदेश व कर्नाटक या दोन राज्यात मागील पाच महिन्यांत सर्वाधिक प्रत्येकी १३ वाघांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आलेली आहे. या राज्यांपाठोपाठ उत्तराखंडमध्ये ९ वाघांचे मृत्यू झाले आहेत. जिम कार्बेट या व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक मृत्यूंची नोंद घेण्यात आलेली आहे. त्या पाठोपाठ महाराष्ट्रात आठ वाघांचे मृत्यू झाले. यामध्ये १४ जानेवारीला खापा व पूर्व पेंच प्रकल्पात, १४ फेब्रुवारी रोजी कोलितमारा, १८ एप्रिल पेंच, मानसिंगदेव, २७ एप्रिल ब्रम्हपुरी, ३ मे सावली, १८ मे तळोधी व २६ मे रोजी चिचपल्ली येथे उष्माघातामुळे वाघिणीचा मृत्यू झाला आहे. वाघांच्या मृत्यूमध्ये सर्वाधिक धक्कादायक मृत्यू हा ‘जय’ या प्रसिध्द वाघाचा छावा श्रीनिवासन याचा मृत्यू आहे. शेतकऱ्याने शेतात लावून ठेवलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून श्रीनिवासनचा मृत्यू झाला. मात्र प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून शेतकऱ्याने शेतातच खड्डा खोदून वाघाचा मृतदेह पुरून टाकला. दरम्यान, महाराष्ट्रापाठोपाठ आसाममध्ये सात वाघांचा मृत्यू झालेला आहे. उत्तरप्रदेशात चार, तामिळनाडूमध्ये दोन तर छत्तीसगड, ओडिशा व केरळ या राज्यात प्रत्येकी एका वाघाच्या मृत्यूची नोंद घेण्यात आलेली आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय तसेच राज्याच्या वन विभागाकडून व्याघ्र संरक्षणाऐवजी व्याघ्र पर्यटनाला अवास्तव महत्त्व दिले जात असल्यामुळे आणि व्याघ्र संरक्षणाकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्यामुळेच वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याची टीका वन्यजीव प्रेमी करीत आहेत.