पैसे वाटपाचे प्रकार, काही केंद्रांवर मतदान यंत्रातील बिघाड अशा काही घटनांचा अपवाद वगळता उत्तर महाराष्ट्रात सहा जागांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सर्वाधिक मतदान दिंडोरी व नंदुरबार मतदारसंघात सुमारे ६५ टक्के तर सर्वात कमी ५६ टक्के मतदान जळगाव मतदारसंघात झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत सर्व मतदारसंघांमध्ये १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. छगन भुजबळ, माणिकराव गावित, हरिश्चंद्र चव्हाण अशा दिग्गजांसह एकूण ९७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
नाशिक मतदारसंघात काँग्रेस आघाडीतर्फे छगन भुजबळ, महायुतीचे हेमंत गोडसे आणि मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांच्यात कडवी झुंज आहे. नाशिक मतदारसंघात ६० टक्के मतदान झाले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे हरिश्चंद्र चव्हाण, आघाडीच्या डॉ. भारती पवार व माकपचे हेमंत वाघेरे यांच्यात मुख्य लढत आहे. दिंडोरीत सुमारे ६५ टक्के मतदान झाले. धुळे मतदारसंघात आघाडीचे अमरिश पटेल आणि महायुतीचे डॉ. सुभाष भामरे यांच्यात मुख्य लढत आहे. या ठिकाणी सुमारे ५८ टक्के मतदान झाले. जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खा. ए. टी. पाटील आणि आघाडीचे सतीश पाटील यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. अत्यंत चुरशीची लढत असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी महायुतीच्या डॉ. हिना गावित यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.