देशातील सर्वाधिक प्रगत राज्य अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्राच्या डोक्यावर सध्या कर्ज आहे तीन लाख कोटी रुपयांचे. या कर्जापोटी राज्य शासनाला प्रत्येक मिनिटाला चार लाख ३५ हजार रुपये मोजावे लागतात. दिवसाला ही रक्कम होते ६३ कोटी रुपये. आणि वर्षांचा हिशेब करायचा तर २४ हजार कोटी रुपये..
महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची बिकट अवस्था मांडली, खुद्द वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात कुलगुरूंनी विद्यापीठाशी संबंधित काही आर्थिक बाबींचे प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित असल्याचा मुद्दा मांडला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आरोग्य विद्यापीठाचे हे प्रश्न सुटावेत म्हणून वित्तमंत्र्यांना खास या ठिकाणी घेऊन आल्याचे सांगितले. हा संदर्भ घेऊन मुनगंटीवार यांनी राज्य शासनाच्या आर्थिक प्रकृतीची माहिती कथन करताना ‘त्रिशूल’ चित्रपटातील संवादफेक केली. राज्याची आर्थिक स्थिती अवघड आहे. तीन लाख कोटींचे कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. त्यापोटी वर्षांला २४ हजार कोटींचे व्याज भरावे लागते. मिनिटाला चार लाख ३५ हजार, तर दिवसाचा विचार केल्यास ६३ कोटींची ही रक्कम आहे. अमिताभ बच्चनचा ‘जेब में फुटी कवडी नही और मैं चला पाच कोटी का सौदा करने’ हा आपला आवडता ‘डायलॉग’ आहे. यामुळे आरोग्य विद्यापीठाने चिंता करण्याची गरज नाही. या स्थितीत विद्यापीठास परीक्षा केंद्र उभारणी व तत्सम कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.