सावंतवाडी शहरात दोन मृत माकडे सापडून आली. त्यांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असता नैसर्गिक मृत्यू असल्याचे त्यांनी सांगितल्याने घाबरण्याचे कारण नाही. दोडामार्ग तालुक्यात पाच आणि सावंतवाडी शहरात दोन अशा सात मृत माकडांची नोंद आतापर्यंत झाली असल्याचे सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी बोलताना सांगितले.
सावंतवाडी शहरात दोन मृत माकडे मिळाली असता या दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या माकडांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगताना घाबरण्याचे काही कारण नसल्याचे म्हटले आहे. या माकडांचे शवविच्छेदन झाल्यावर त्यांची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली, असे उपवनसंरक्षक रमेशकुमार म्हणाले. केरमधील एका मृत माकडाचा शवविच्छेदन अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील अन्य चार माकडांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. दोडामार्ग तालुक्यात पाच आणि सावंतवाडी शहरात दोन मृत माकडांची नोंद वनखात्याकडे आहे. आणखी कुठे माकडे मृत झाल्याची नोंद नाही असे रमेशकुमार म्हणाले.
माकड तापाबाबत कर्नाटकची टीमने मोहीम हाती घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. हा ताप गोवा व कर्नाटकात यापूर्वीच आहे. त्यामुळे नेमका तापाचा संसर्ग कोठून झाला हे आरोग्य यंत्रणाच सांगू शकेल, असे रमेशकुमार म्हणाले.
वनखात्याची यंत्रणा सतर्क आहे. त्यामुळे कोणी घाबरून जाण्यापेक्षा माकड मृत आढळल्यास कळवावे, असेही ते म्हणाले.