नक्षलवाद्यांचा विरोध झुगारून ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात स्थानिक आदिवासींनी ७० टक्क्यांवर मतदान केल्याने नक्षली नेते चांगलेच चिंताग्रस्त झाले आहेत. केवळ दहशतीच्या बळावर आजवर आदिवासींना रोखून धरले होते. मात्र, आता बंदुकीची दहशतही आदिवासींना मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही, हे मतदानाच्या टक्केवारीवरून स्पष्ट झाल्याने नक्षलवादी संघटना हादरली आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ातील अहेरी उपविभागांतर्गत अहेरी, सिरोंचा, भामरागड व एटापल्ली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी २४ एप्रिलला झालेल्या निवडणुकीत स्थानिक आदिवासींनी ७० टक्क्यांवर मतदान केले. अहेरी तालुक्यात सर्वाधिक ७३ टक्के मतदान झाले. त्यापाठोपाठ सिरोंचा ७२, एटापल्ली ५५ व जिमलगट्टा ६३ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे, या सर्व ग्रामपंचायती नक्षलग्रस्त आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हापासूनच नक्षलवाद्यांची गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी धमक्या देण्यास सुरुवात केली होती. मतदानासाठी घराबाहेर पडणाऱ्याला ठार केले जाईल, लोकशाहीवर विश्वास ठेवू नका व मतदानाला घराबाहेर पडू नका, असेही आवाहन करण्यात आले होते. परिणामी, ४३ ग्रामपंचायतींमध्ये केवळ एक ते दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. लोकांच्या मनात दहशत कायम राहावी म्हणून अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील उपसरपंच पत्रू दुर्गे याची हत्या करण्यात
आली.
नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे लोक मतदानासाठी घराबाहेर पडणार नाही, असे वाटत असतानाच आदिवासींनी मात्र नक्षलवाद्यांची दहशत झुगारत उत्साहाने मतदान केले. त्यामुळे नक्षल नेते चिंताग्रस्त झाले आहेत. इतक्या दहशतीनंतरही आदिवासी मतदानासाठी बाहेर पडले म्हणजे गावकऱ्यांचा नक्षलवाद्यांवरील विश्वास कमी झाला, हेच यातून स्पष्टपणे दिसून आले आहे. त्यामुळे नक्षलवादी चांगलेच हादरले आहे. ३० एप्रिलला या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात कोरची, आरमोरी, धानोरा, मुलचेरा, चामोर्शी, कुरखेडा, या तालुक्यात निवडणूका होत आहे. किमान आता तरी दहशत निर्माण करता यावी म्हणून नक्षलवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूसंपादन विधेयकाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी २५ एप्रिल ते १ मे या कालावधीत संघर्ष सप्ताह पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, या संघर्ष सप्ताहालाही आदिवासींकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नक्षल्यांची चिंता आणखीच वाढली आहे. एकीकडे गावकरी ग्रामपंचायत निवडणुकीत विक्रमी मतदान करतात, तर दुसरीकडे संघर्ष सप्ताहाला प्रतिसाद देत नसल्यामुळे नक्षली नेते चांगलेच हादरले आहेत. दरम्यान, ३० एप्रिलला ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही चांगले मतदान होईल,
असा विश्वास जिल्हा पोलिस दलाला आहे.