जिल्हय़ात दुष्काळाचे मोठे सावट आहे. या वर्षी अपेक्षित पाऊस नाही. त्यामुळे आपण चिंतेत आहोत. टँकरग्रस्त गावांत साखळी बंधारे बांधण्यासाठी ८ कोटी रुपये मुख्यमंत्री निधीतून दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
औसा तालुक्यातील लामजना येथे छत्रपती शिवरायांच्या राज्यातील सर्वात मोठय़ा अश्वारूढ पुतळय़ाचे अनावरण चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यानंतर जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. तत्पूर्वी औसा तहसील कार्यालय व प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन त्यांनी केले. पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, पालकमंत्री सतेज पाटील, दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, राज्यमंत्री अमित देशमुख, आमदार बसवराज पाटील, दिलीपराव देशमुख यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, की या वर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पाणीपातळी अर्धा ते एक मीटरने खाली गेली आहे. जिल्हय़ात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यापुढे टँकर वाढवावे लागतील. सरकार यासाठी सर्व उपाययोजना करेल. गारपिटीनंतर या परिसरात आपण येऊन गेलो. त्यानंतर राज्यातील अडीच लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३३४ कोटी रुपये जमा केले. जिल्हय़ात टँकरग्रस्त गावांत साखळी बंधारे बांधले पाहिजेत, त्यातून पाण्याची पातळी वाढेल. पाझर तलावाची दुरुस्ती प्रलंबित आहे. यासाठी नियमित निधी उपलब्ध होईलच. मुख्यमंत्री निधीतून ८ कोटी मंजूर करीत असल्याची घोषणा त्यांनी केली.
आमदार बसवराज पाटील यांनी बंद पडलेला किल्लारी सहकारी साखर कारखाना चालवून दाखवला व कारखान्याचे २४ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज फेडले. कारखान्याची कर्जमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे, असे सांगून ते म्हणाले, की राज्य सरकारने मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण दिले. या निर्णयाला घटनात्मक आधार आहे. धनगर समाजाचीही आरक्षणाची मागणी आहे. इतरांवर अन्याय होऊ न देता त्यांना आरक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार आहोत. चाकूरकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचीही भाषणे झाली. औसा, निलंगा, तुळजापूर, उमरगा परिसरातील लोक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.