आवाजाचा पोत जाडाभरडा. भाषेला ग्रामीण ठसकेबाज. एका हातात धोतराचे टोक आणि नजरेला नजर देत आपले करून घेण्याची किमया, असे व्यक्तिमत्त्व दुर्मिळच. सोशल नेटवìकगच्या महाजंजाळात, मोदी लाट, शरद पवारांच्या टीकेची झोड आणि उद्धव ठाकरे यांचे आव्हान असतानाही मधुकर चव्हाण पाचव्यांदा निवडून आले. आगपाखड केल्यानंतरही विरोधकांना चोख उत्तर देत ३० हजार मतांची आघाडी घेत आपले निर्वविाद नेतृत्व सिद्ध केले.
तुळजापूरची या मतदारसंघाची तुळजाभवानीशिवाय आणखी एक ओळख म्हणजे धोतर घालणारे आमदार. मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून आजवर या मतदारसंघातून ज्यांनी नेतृत्व केले, ते सर्व जण धोतरवाले. मागच्या तीन निवडणुकांत धोतर घालणाऱ्या मधुकर चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी अनेक पँटवाल्या उमेदवारांनी जिवाचे रान केले. मात्र तुळजापूरकरांचे धोतर आणि धोतरातील आमदार, यावरील प्रेम घटले नाही. चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तुळजापुरात येऊन खालच्या पातळीवर शेरेबाजी केली. ‘म्हातारा झालेला बल काय कामाचा’, असा सवाल तुळजापूरकरांना पवारांनी विचारला.  गावरान गडी असलेल्या मधुकर चव्हाण यांनीही प्रचारादरम्यान जशास तसे उत्तर देत राष्ट्रवादीचे उमेदवार आणि शरद पवार या दोघांवर शिवराळ भाषेत हल्ला चढवला.
लोकसभा निवडणुकीत ज्यांच्या लाटेमुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील बहुतेक मंत्री वाहून गेले, त्या नरेंद्र मोदी यांनीदेखील चव्हाण यांच्या विरोधात तुळजापुरात सभा घेतली. देशात लाट असली तरी तुळजापुरात चव्हाण यांचा जनसंपर्क तोडण्यात भाजपला यश मिळाले नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावरही पालकमंत्री मधुकर चव्हाण हेच होते. ते आता ८० वर्षांचे आहेत तरीही विरोधकांना त्यांच्याएवढा जनसंपर्क साधता आला नाही. सलग चौथ्यांदा आणि राजकीय आयुष्यात पाचव्यांदा विधानसभेवर गेलेल्या चव्हाण यांनी तुळजापूरचा आमदार म्हणजे ‘धोतरातील आमदार’ ही ओळख यंदाही पुसू दिली नाही.