* प्रति हेक्टरी २२ लाख ५० हजार सानुग्रह अनुदान
* महसूल व वन विभागाचा शासन निर्णय
जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पासाठी ज्यांची जमीन संपादित केलेली आहे, अशा प्रकल्पग्रस्तांना खास बाब म्हणून नुकसानभरपाईच्या ८० पट मोबदला सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी जैतापूर परिसरातील पाच गावांमधील मिळून सुमारे तेवीसशे प्रकल्पग्रस्त खातेदार आहेत. त्यांना यापूर्वी शासकीय दराने प्रति हेक्टरी २८ हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. त्यानुसार आत्तापर्यंत जेमतेम दहा टक्के खातेदारांनी ही भरपाई स्वीकारली आहे. अन्य प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि मच्छीमारांचा या प्रकल्पालाच ठाम विरोध आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली असून, सुमारे दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्रकल्पविरोधी हिंसक आंदोलनात एका युवकाचा मृत्यू झाला होता. या पाश्र्वभूमीवर मोबदल्यात घसघशीत वाढ केल्यास विरोधाची तीव्रता कमी होईल, या अपेक्षेने रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली फेरविचारासाठी खास समिती नेमण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे राज्याच्या महसूल व वन विभागाने गेल्या ५ फेब्रुवारी रोजी खास शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीला प्रति हेक्टरी २२ लाख ५० हजार रुपये वाढीव दराने मोबदला म्हणून सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
निर्णय फक्त जैतापूरसाठीच  : केंद्र शासनाच्या अणुऊर्जा महामंडळातर्फे ही रक्कम उपलब्ध करुन देण्यात येणार असल्यामुळे, तसेच प्रकल्पाला स्थानिक लोकांचा पाठिंबा असणे अत्यंत महत्वाचे असल्यामुळे विशेष बाब म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील अन्य कोणत्याही प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू होणार नाही, असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.