ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक, पर्यावरण, स्त्रीभ्रूण हत्या आदी सामाजिक विषयांवरील चित्ररथ, पारंपरिक नमन, खेळे, दशावतार, आदिवासी तारपा नृत्य, जोगेश्वरी, करंजेश्वरी, सोमेश्वर देव, ग्रामदैवत श्रीदेव काळभैरी या देवतांच्या पालख्या हे शुक्रवारी सकाळी निघालेल्या ग्रंथदिंडीचे विशेष आकर्षण ठरले. हजारो चिपळूणकरांचा उत्सवी सहभाग, दिंडीच्या मुख्य मार्गावर व चौकाचौकात काढण्यात आलेल्या रांगोळ्या, दिंडीत सहभागी झालेल्यांवर काही संस्थांकडून करण्यात आलेली पुष्पवृष्टीही लक्षवेधी होती.
लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिर चिपळूणातील ज्या मूळ जागी सुरू झाले, त्या ठिकाणाहून ग्रंथदिंडीची सुरुवात झाली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष व जलसंपदामंत्री सुनील तटकरे, मावळते अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, संमेलन समितीचे कार्यवाह प्रकाश देशपांडे, आमदार सदानंद चव्हाण, चिपळूणच्या नगराध्यक्षा सावित्री होमकळस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दिंडी चिपळूण नगरपालिका कार्यालयासमोर आली तेव्हा नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले येथे सहभागी झाले. कार्यालयाच्या आवारात असलेल्या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला १११ दिव्यांनी औक्षण करण्यात येऊन दिंडी पुढे मार्गस्थ झाली. मुख्य बाजारपेठ, चिंचनाका, गुहागर-विजापूर रस्ता आदी प्रमुख मार्गावरून ही दिंडी संमेलनाच्या मुख्य मंडपात विसर्जित करण्यात आली.
या दिंडीत चिपळूण आणि परिसरातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्था, महिला मंडळे, चिपळूण मुस्लीम समाज, राजमाता जिजाऊ महिला मंडळ, रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टुरिझम आदींसह साठहून अधिक संस्था, पर्यावरण, स्त्रीभ्रूण हत्या आणि अन्य विषयांवरील २० चित्ररथ, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, रामदास स्वामी, ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक आदींच्या वेशभूषेतील विद्यार्थी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. दिंडीतील सहभागी प्रत्येकाच्या डोक्यावर ‘लोटे परशुराम औद्योगिक वसाहत’ असे नाव लिहिलेल्या गांधी टोप्या होत्या. चिपळूण मुस्लीम समाज, त्वष्टा कासार समाजाचे पदाधिकारी, आळंदी येथील दिंडीपथक, स्थानिक भजनपथकही दिंडीत सहभागी झाले होते.
ग्रंथदिंडीत सुमारे पाच हजार चिपळूणकर उत्साहाने सहभागी झाले होते. आपल्या घरचेच कार्य असल्यासारखे चिपळूण नागरिक नटून-थटून तर काहीजण पारंपरिक वेषात दिंडीत सहभागी झाले होते.
 क्षणचित्रे
*  अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
* ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे कविवर्य सुरेश भट यांचे मराठी अभिमान गीत आणि ‘सह्य़ाद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण, राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन’ हे कवी माधव यांचे गीत शालेय विद्यार्थ्यांनी सादर करीत साहित्यप्रेमींचे मन जिंकले.
* २२ वर्षांपूर्वी रत्नागिरी येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष मधुमंगेश कर्णिक आणि उत्तम कांबळे या दोन माजी संमेलनाध्यक्षांनी उपस्थित राहून सत्काराचा स्वीकार केला.
* ‘रत्नावली’ या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन संमेलनाचे उद्घाटक आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले.
* कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि पाणीपुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे या श्रोत्यांमध्ये असलेल्या दोन मंत्र्यांचा जागेवर जाऊन सत्कार करण्यात आला.
* उल्हास पवार, आमदार निरंजन डावखरे, श्रीनिवास पाटील, विजय कोलते या राजकीय नेत्यांसह प्रभा गणोरकर, रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, अशोक बागवे हे साहित्यिक श्रोत्यांमध्ये पहिल्या रांगेत होते.
वसिष्ठीच्या तीरावरून
* ‘युटोपिया’चे पॅव्हेलियन!
संमेलननगरीत संमेलनाला भरीव आर्थिक मदत करणाऱ्या ‘युटोपिया कन्स्ट्रक्शन’ कंपनीने आपल्या प्रसिद्धीसाठी मोठे दालन उघडले आहे. या दालनात कॉफी टेबल, जीम व भव्य प्रसंग उभे करण्यात आले असून त्यासाठी माणसांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. या पुतळ्यांसोबतच सजीव माणसे पुतळ्यासारखी बसलेली पाहणे, हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. येथे येणारे रसिक पुतळा व या माणसांबरोबर कॅमेऱ्यात व मोबाइलमध्ये आपली छायाचित्रे काढून घेत आहेत.
भोजनाचा ‘अपूर्व’ आनंद
साहित्य संमेलनाच्या ठिकाणी भोजनव्यवस्थेचे नियोजन महत्त्वाचे ठरते. हे नियोजन कोलमडले तर संयोजकांची मोठीच तारांबळ उडते. चिपळूण संमेलननगरीत भोजनकक्षातील शिस्तबद्धता व नियोजनामुळे साहित्यप्रेमी आणि रसिकांना भोजनाचा ‘अपूर्व’ आनंद घेता आला.
*  रात्री अकरालाही गर्दी
संमेलनाच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी रात्री अकरा-साडेअकरानंतरही संमेलनस्थळी चिपळूणकर नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. विद्यार्थी व युवकांची संख्याही लक्षणीय होती. कुटुंबासहित मंडळीही मोठय़ा प्रमाणात आली होती. संमेलनस्थळी असलेल्या शिवाजी महाराजांचा दरबार, कोकणनगरी येथे रसिक छायाचित्रे काढून घेत होते.
*  गती.. तटकरे आणि डावखरेंची
राजकारणी आणि साहित्यिक यांच्यातील संबंध शरद पवार यांनी आपल्या खुमासदार शैलीत उलगडले. आचार्य अत्रे, निसर्गकवी ना. धो. महानोर आणि महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांचा दाखला देत पवार म्हणाले, ‘प्रत्येक मुलाने ‘नाच रे मोरा’ गाण्यावर नृत्य केले आहे. गीतरामायण हा त्यांच्या प्रतिभेचा उत्तुंग अविष्कार. तशी ‘बुगडी माझी सांडली गं’ ही लावणी प्रत्येकालाच भावते. सुनील तटकरे यांना लावणीमध्ये गती आहे, हे ऐकून आश्चर्य वाटले. तटकरे यांच्याऐवजी वसंतराव डावखरे यांचे नाव घेतले असते तर नवल वाटले नसते.’ शरद पवार यांच्या नर्मविनोदी कोटीवर हास्याची कारंजी न फुलतील तरच नवल!

साहित्य संमेलनात आजचे कार्यक्रम
स. ९.३० ते ११  खुल्या गप्पा (सभामंडप १) सहभाग – अशोक नायगावकर, रामदास फुटाणे
स. ९.३० ते ११ परिसंवाद – जागतिकीकरण आणि आजची मराठी कादंबरी. (सभामंडप २) अध्यक्ष – रवींद्र शोभणे.
स. ११ ते १ . परिसंवाद – यशवंतराव चव्हाण यांचे विचारविश्व आणि आजचा महाराष्ट्र. अध्यक्ष – माजी आमदार निशिकांत जोशी
दु. २.३० ते ४ –  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस वाहिलेला परिसंवाद – आमच्या रेषा बोलतात भाषा. अध्यक्ष – शि. द. फडणीस. विशेष उपस्थिती – उद्धव ठाकरे
दु. २.३० ते ४ – निमंत्रितांचे कवी संमेलन (सभामंडप २)
दु. ४.३० ते ६ – परिसंवाद – आम्ही काय वाचतो आणि का वाचतो? अध्यक्ष- खासदार सुमित्रा महाजन.
सायं. ६ ते ९ – कविसंमेलन (सभामंडप १)
रा. ९.३० – अमृताचा वसा. सहभाग – संगीतकार कौशल इनामदार, कमलेश भडकमकर आणि सहकारी  (सभामंडप१)