बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागाचा ९२.१३ टक्के इतका विक्रमी निकाल बुधवारी लागला. निकालाची वैशिष्टये मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत ७.४२ टक्के इतके जास्त आहे. ९२.६२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होणाऱ्या सातारा जिल्ह्याने पहिले स्थान पटकाविले. सांगली जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९२.२८ होती, तर तळाच्या स्थानी राहिलेल्या कोल्हापूरची टक्केवारी होती ९१.६४ टक्के.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल बुधवारी येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयात विभगीय सहसचिव शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत घोषित केला. गतवर्षी १२ वी चा निकाल ९१.५४ टक्के इतका होता. तुलनेत यंदा ०.५९ टक्के वाढ झाली आहे. या परीक्षेसाठी ६४ हजार ५३० मुले, तर ५१ हजार २०७ मुली परीक्षार्थी होत्या. यामध्ये उत्तीर्ण मुलांची ५७ हजार ३३४  (८८.८५ टक्के) तर मुलींच्या उत्तीर्णतेची संख्या ५९ हजार २९७ (९६.२७ टक्के) इतकी आहे.
सातारा जिल्ह्यात ३५ हजार ९९८ पकी ३३ हजार ३४९ (९२.६४ टक्के), सांगली जिल्ह्यात ३२ हजार ४८८ पकी २९ हजार ९८१  (९२.२८ टक्के) व कोल्हापूर जिल्ह्यात ४७ हजार २५१ पकी ४३ हजार ३०३ (९१.६४ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थी (रीपिटर) विद्यार्थ्यांमध्येही सातारा जिल्ह्यानेच बाजी मारली. या विभागात सातारा जिल्ह्यातील २३१३ पकी १०५४ (४५.५७ टक्के), सांगली जिल्ह्यात १९०९ पकी ७८८ (४१.२८ टक्के) व कोल्हापूर जिल्ह्यात २५०४ पकी १०७८ (४३.०५ टक्के) इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला, विज्ञान, वाणिज्य यामध्येही सातारा जिल्हा आघाडीवर असल्याचे दिसून आले.
कोल्हापूर जिल्ह्याचा बोर्डाच्या इतिहास३त सर्वोच्च निकाल लागला असला तरी मागील वर्षी कोल्हापूर जिल्हा विभागात प्रथम तर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होता. यंदा यामध्ये घट होऊन जिल्हा तिसऱ्या स्थानावर घसरला. यामुळे उत्तीर्णतेचा टक्का वाढला पण राज्यातील क्रमांक घसरला अशी कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती आहे.